कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्माच्या वादळी शतकांच्या जोरावर टीम इंडियाने गुवाहाटी वन डेत विंडीजचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे (152*) दमदार नाबाद दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे (140) आक्रमक शतक या जोरावर भारताने 323 धावांचे मोठे आव्हान अवघ्या 42.1 षटकात केवळ 2 फलंदाजांच्या मोबल्यात लिलया पार केले. आपल्या दीडशतकी खेळीमध्ये रोहित शर्माने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

या खेळीत रोहितने 8 षटकारांची आतिषबाजी केली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार लगावणारा तीसरा खेळाडू बनला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर आता 194 षटकार झाले आहेत, त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 189 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. या क्रमवारीत आता केवळ महेंद्र सिंह धोनी(210) आणि सचिन तेंडुलकरच्या (195) तो मागे आहे. रोहितचा सध्याचा फॉर्म बघता उर्वरित सामन्यांमध्ये तो हा विक्रमही मोडीत काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय भारताकडून सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकरने मारलेल्या 167 षटकारांचाही विक्रम रोहितने मोडीत काढला. सलामीवीर म्हणून रोहितच्या नावावर आता 171 षटकारांची नोंद झाली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये केवळ ख्रिस गेल आणि सनथ जयसुर्या हेच सलामीवीर याबाबतीत रोहितच्या पुढे आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे सलामीवीर –
ख्रिस गेल –  272
सनथ जयसूर्या –  263
रोहित शर्मा – 171
सचिन तेंडुलकर – 167
अॅडम गिलख्रिस्ट – 144