पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. हिटमॅन रोहित शर्मा अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. रोहित शर्मानं इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्याला मुकला होता. एनसीएमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर आज, बुधवारी पहाटे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे.

रोहित शर्मा दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रोहित शर्मा १४ दिवस क्वारंटाइनमध्ये असणार आहे. विलगीकरणाच्या या कालावधीत रोहित शर्मा फिटनेस जपण्याची योग्य ती खबरदारी घेईल. २९ तारखेला रोहित शर्माचा क्वारंटाइन कालावधी संपेल.त्यानंतर १० दिवसानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा उपलबद्ध असणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे.

आणखी वाचा- रात्र ऑस्ट्रेलियाची आहे… Day Night कसोटीमधील कांगारुंचा विराट विक्रम भारताला धडकी भरवणाराच

संयुक्त अरब आमिराती येथे झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे रोहित मुंबईकडून काही सामने खेळला नव्हता. याच सुमारास निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड केली होती. दुखापतीचं कारण देत रोहित शर्माला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर निवड समितीने फिटनेस तपासणी घेऊन रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, वडिलांना करोना झाल्यामुळे रोहित शर्मा भारतीय संघासोबत दुबईला न जाता मुंबईत परतला आणि त्यानंतर एनसीएमध्ये फिटनेस चाचणीसाठी गेला.