करोनामुळे सध्या जगभरातील क्रिकेट सामने बंद आहेत. क्रिकेटपटूंना आपल्या फॅन्सशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विविध क्रीडा वाहिन्या, संकेतस्थळे क्रिकेटपटूंच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यावर जोर देत आहेत. क्रिकेटपटू देखील आपल्या सहकाऱ्यांशी लाइव्ह चॅटच्या मार्फत संवाद साधत आहेत. नुकताच भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने आपले सहकारी मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांच्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून गप्पा मारल्या.

रोहित-शिखर-मयंक या तिघांनी इन्स्टाग्राम लाईव्ह केलं. त्या तिघांनी वेगवेगळ्या विचारावर खूप गप्पा मारल्या. त्यांच्या संभाषणातील एक मजेशीर व्हिडीओ इंडियन क्रिकेट टीम या bcci च्या व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाऊंट वरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लाईव्ह चॅटदरम्यान रोहित आणि शिखर एका विषयावर खो खो हसू लागले.

मयंकने शिखर धवनला प्रश्न विचारला की अनेक लोक म्हणतात की तुम्ही पंजाबी गाणी चांगली गाता. त्यावर शिखर धवन लगेच म्हणाला की असं तुला कोणी सांगितलं असेल तर चूक आहे. माझी पंजाबी गाणी फक्त रोहितच ऐकतो. त्यावर रोहितने संभाषणात सहभाग घेतला आणि तो म्हणाला की शिखर पंजाबी गाणी गातो पण तो पंजाबी गाण्यावर डान्स अगदी उत्तम करतो. त्यानंतर शिखरने रोहितला एका पंजाबी गाण्याची आठवण करून दिली. ते गाणं ऐकवून ऐकवून शिखरने रोहितला हैराण केलं होतं. त्यामुळे त्या गाण्याचे शब्द ऐकताच लाईव्ह चॅटमध्ये रोहित आणि शिखर खो खो हसत सुटले. मयंकला सुरुवातीला हसण्याचे कारण समजले नाही, पण नंतर मात्र तो पण त्यांच्यात सहभागी झाला.

दरम्यान, आतापर्यंत लॉकडाउनमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी इन्स्टाग्राम लाईव्ह केले आहे, पण ते दोन खेळाडूंपुरते होते. रोहित-शिखर-मयंक यांनी तीन जण एकत्र इन्स्टाग्राम लाईव्ह करत आल्याचा हा प्रयोग केला, आणि तो खूपच हिट ठरला.