भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी २० मालिकेत विजय साकारू शकला नाही. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसरा सामना भारताने सहज जिंकला होता. पण तिसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारतीय संघाला पाणी पाजले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत भरवशाच्या रोहित शर्माने घोर निराशा केली. त्यामुळे त्याच्यावर काही अंशी टीकादेखील करण्यात आली. आफ्रिकेविरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेतही रोहितला संधी देण्यात आली आहे. गेल्या काही काळात रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये चाहत्यांना निराश केले आहे. त्यामुळे त्याच्या कसोटी समावेशावरून चर्चांना उधाण आले आहे. पण भारतीय संघाचा आघाडीचा माजी गोलंदाज जहीर खान याने मात्र रोहितची पाठराखण केली आहे.

जहीर खान

निवड समितीने कसोटी संघात रोहित शर्माला आणखी किती वेळा संधी दिली पाहिजे? असा प्रश्न जहीरला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर बोलताना तो म्हणाला रोहितला संधी किती द्यायची याचं उत्तर काळच ठरवेल. आता जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे. रोहितसारख्या खेळाडूला तुम्ही कसोटी संघातून बाहेर ठेवूच शकत नाही. रोहितसारखा ‘इन-फॉर्म’ खेळाडू कसोटी संघात असणे हे त्याच्या स्वत:साठी आणि टीम इंडियासाठी, दोघांसाठीही लाभदायक आहे.

“रोहित स्वत: कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कायम उत्सुक असतो. गेल्या काही काळात झालेल्या कसोटी मालिका पाहिल्या, तर रोहितच्या संघात असण्याने काही निकाल भारताच्या बाजूने लागू शकले असते. जेव्हा तुम्ही १५ खेळाडूंच्या चमूत रोहितला निवडता, तेव्हा त्याला अंतिम ११ मध्ये संधी दिली जायलाच हवी”, असेही जहीरने नमूद केले.