विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर स्पर्धेतील आव्हान संपणाऱ्या भारतीय संघात आगामी काही दिवसांमध्ये अनेक महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ) एका आधिकाऱ्यानुसार विराट कोहलीला एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर त्याजागी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची सुत्रे सोपवण्यात येणार आहेत. विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात कोणताही वाद नसल्याचे यावेळी आधिकाऱ्याने सांगितले.

आयएएनएस या वृत्त संस्थेला बीसीसीआयच्या आधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघाला आधिक बळकट करण्यासाठी संघात बदल केले जाणार आहेत. रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्याची ही योग्य वेळ आहे. रोहित शर्मा मानसिकरित्या कर्णधारपद सांभाळण्यासाठी सक्षमही आहे. रोहितकडे कर्णधारपद देण्यासाठी विराट कोहली आणि संघव्यवस्थापकानेही समर्थन द्यावे.

सीओएचे प्रमुख विनोद राय यांनीही विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीवर समिक्षा बैठक होणार असल्याचे सांगितले आहे. या बैठकीला कर्णधार विराट कोहली, कोच रवी शास्त्री आणि निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसादही उपस्थित राहणार असल्याचे बीसीसीआयच्या आधिकाऱ्याने सांगितले. बीसीसीआयचा आधिकारी म्हणाला की, ‘भूतकाळात काय झाले, त्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. सध्या भारतीय संघाचा पुढील तयारीचा विचार करण्याची ही वेळ आहे. पुढील विश्वचषकाची तयारी करायला हवी. तशापद्धतीने संघाची बांधणी आतापासूनच करायला हवी. तशा योजना अखायला हव्यात.’

रवी शास्त्रींनाही पुन्हा अर्ज करावा लागणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच मुख्य प्रशिक्षकांसह साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर रवी शास्त्री यांनाही पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा विद्यमान साहाय्यक प्रशिक्षकांमध्ये समावेश आहे. विश्वचषकानंतर लगेचच भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असल्यामुळे या सर्वाना ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे