अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका

बर्मिगहॅम : कारकीर्दीतील आठवा कसोटी सामना खेळणारा सलामीवीर रॉरी बर्न्‍स याने साकारलेल्या संयमी शतकाच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवले.

दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ४ बाद २६७ धावा केल्या असून बर्न्‍स १२५ तर बेन स्टोक्स ३८ धावांवर खेळत आहे. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी इंग्लंडला फक्त १८ धावांची आवश्यकता आहे.

गुरुवारच्या बिनबाद १० धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडने सलामीवीर जेसन रॉयला (१०) लवकर गमावले. जेम्स पॅटिन्सनने त्याला स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले. परंतु त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि बर्न्‍स यांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर देत दुसऱ्या गडय़ासाठी १३२ धावांची भागीदारी रचली. रूट कारकीर्दीतील १७वे अर्धशतक साकारून ५७ धावांवर पीटर सिडलच्या गोलंदाजीवर बाद झाला.त्यानंतर जो डेन्ली (१८) आणि जोस बटलर (५) यांनी निराशा केल्यामुळे इंग्लंडची अवस्था ४ बाद १९४ अशी झाली होती. पण बर्न्‍सने बेन स्टोक्ससह इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले.

संक्षिप्त धावफलक

’ ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २८४

’ इंग्लंड (पहिला डाव) : ९० षटकांत ४ बाद २६७ (रॉरी बर्न्‍स खेळत आहे १२५, जो रूट ५७; जेम्स पॅटिन्सन २/५४).