१५ ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश ब्रिटीशांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. त्यामुळे सर्व भारतीयांसाठी हा दिवस खास आहे. पण भारताला जगात ओळखून दिलेल्या ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरसाठी १५ ऑगस्टसह १४ ऑगस्टचा दिवसही ‘स्पेशल’ आहे.

१४ ऑगस्ट १९९० या दिवशी सचिन तेंडुलकरने क्रिकेट जगतात एका महत्वाच्या विक्रमाचा पाया रचला आणि क्रिकेटप्रेमींना आपली दखल घेण्यास भाग पाडले. सचिनने आंतरराराष्ट्रीय पातळीवर आपले पहिलेवहिले शतक आजच्या दिवशी ठोकले. सचिनने इंग्लंडविरूद्ध ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर दमदार ११९ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या बळावर भारताला तो कसोटी सामना वाचवणे शक्य झाले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सचिनच्या या खास क्षणांना उजाळा दिला. BCCI ने ट्विटरवर सचिनचा एक फोटो पोस्ट केला आहे. १९९० साली आजच्या दिवशी सचिनने कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. तो क्षण अप्रतिम होता, असा शब्दात BCCI ने त्या आठवणींना उजाळा दिला आहे.

याशिवाय ICC ने देखील सचिनच्या त्या आठवणींना उजाळा दिला आहे. “१९९० साली सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या शंभर शतकांपैकी पहिले शतक झळकावले होते. कसोटीच्या पाचव्या दिवशी त्याच्या नाबाद ११९ धावांच्या खेळीमुळे भारताला इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामना वाचवणे शक्य झाले होते. तसेच सचिनही कसोटी क्रिकेटमधील शतक ठोकणाऱ्या तरूण खेळाडूंच्या यादीत तिसरा खेळाडू ठरला होता, अशा शब्दात ICC ने पोस्ट ला कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, त्या नंतर सचिनने २४ वर्षांच्या समृद्ध कारकिरर्दीत एकूण शंभर शतके ठोकली.