जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा रोल मॉडेल आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या खासदारकीच्या अखेरच्या काळात सचिनने खेळलेला स्ट्रेट ड्राइव्ह पाहून सर्व चाहत्यांना त्याचा अभिमान वाटणार आहे. सहा वर्षांच्या कालावधीत खासदारकीचं वेतन आणि इतर भत्ते मिळून मिळणारा सर्व निधी सचिनने पंतप्रधान कार्यालयाला दान केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनने पगार आणि भत्त्यांमधून मिळालेली अंदाजे ९० लाखांची रक्कम पंतप्रधान सहायता निधीला दिलेली आहे.

पंतप्रधान कार्यालयानेही सचिन तेंडुलकरने दिलेल्या मदतीची दखल घेत पोचपावती दिली आहे. “आपण केलेल्या मदतीची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे. देशभरात संकटात अडकलेल्या व्यक्तींसाठी तुम्ही केलेली मदत कामाला येणार आहे”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सचिनचे आभार मानले आहेत. खासदारकीच्या काळात सचिनवर राज्यसभेतल्या उपस्थितीवरुन अनेकदा टीका झाली होती. मात्र खासदार म्हणून सचिनने मिळालेल्या निधीचा चांगला वापर केला आहे.

सचिन तेंडुलकरच्या कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सचिनने सहा वर्षांच्या कालावधीत खासदार या नात्याने १८५ प्रकल्पांना सहकार्य केलं आहे. मंजूर केलेल्या ३० कोटींच्या निधीपैकी सचिनने १८५ प्रकल्पांसाठी ७.४ कोटीचा निधी प्रकल्पांसाठी दिला. तर उर्वरित निधी सचिनने देशभरात शैक्षणिक, बांधकाम, शाळांचं आधुनिकीकरण यांच्यासाठी दिला आहे. याचसोबत प्रधानमंत्री आदर्श ग्रामसडक योजनेअंतर्गत सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशमधील पुट्टम राजू कोंड्रीगे आणि महाराष्ट्रातील डोंजे ही गावं दत्तक घेतली आहेत.