दुपारी ३.३३ची वेळ.. अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असलेला मुरली विजय बाद झाला आणि स्टेडियमवर बसलेल्या प्रत्येकाने एकच जयघोष केला. शिरस्त्याप्रमाणे अंग मोकळे करत तो आला. सीमारेषेजवळ काहीसे वाकत मग आकाशाकडे बघत त्याने मैदानावर पाऊल ठेवले आणि आधीच टिपेला पोहोचलेला ‘सचिन..सचिन’ नावाचा घोषा पराकोटीला पोहोचला. त्याच्या साऱ्या लकबी नेहमीच्याच. पण कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या सचिनला पाहण्यासाठी जमलेल्या हजारो प्रेक्षकांसाठी ती विलक्षण अनुभूती होती. सचिनचा प्रत्येक फटका, प्रत्येक धाव डोळय़ांत साठवत जल्लोष करणाऱ्या चाहत्यांमुळे अवघे वानखेडे बेभान-वेडे झाले होते.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत असा कसोटी सामना असला तरी कोणालाही सचिनशिवाय काही दिसत नव्हते. सचिनची छायाचित्रे, त्याच्याबद्दलचे कौतुकोद्गार, त्याच्यासाठी संदेश असलेले फलक, टी शर्ट अशा वातावरणाने साऱ्यांनाच भारून टाकले होते. वेस्ट इंडिजचा संघ दुपारी दोन वाजता बाद झाल्यानंतर हा ‘भार’ अधिकच वाढला. विजय बाद होताच सचिन मैदानात उतरला तेव्हा आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. वानखेडेवर उपस्थित क्रिकेटरसिकांनी सचिनला उभे राहून मानवंदना दिली, तर वेस्ट इंडिजच्या संघाने त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. शेन शिलिंगफोर्डला डीप स्क्वेअर लेगला एकेरी धावा काढून आपले खाते उघडणाऱ्या सचिननेही आश्वासक फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून निघालेला प्रत्येक चेंडू प्रेक्षकांतून टाळय़ा आणि शिटय़ा झेलत होता. सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी दिवसाचा खेळ संपला तेव्हाही सचिन पॅव्हेलियनमध्ये परतेपर्यंत कोणीही जागेवरून हलले नाही.
दिवस पहिला
* कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून सचिनला दोनशेव्या सामन्याची खास टोपी.
* सचिनच्या टपाल तिकिटाचे अनावरण. या विशेष तिकिटाची किंमत २० रुपये.
* मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) सचिनला खास चित्राची भेट.
* बीसीसीआयकडून ‘एसआरटी’ लिहिलेला चषक सचिनला प्रदान.
* वेस्ट इंडिजच्या संघाकडून त्यांच्या खेळाडूंच्या स्वाक्षऱ्यांची फ्रेम कर्णधार डॅरेन सॅमीने सचिनला भेट म्हणून दिली.
* नाणेफेकीसाठी सचिनची छबी कोरलेले सोन्याचे नाणे.
१५ नोव्हेंबर १९८९.. १५ नोव्हेंबर २०१३
दिवसअखेर ३८ धावांवर खेळणारा सचिन शुक्रवारी क्रिकेटरसिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारे शतक साकारणार का, ही उत्कंठा सर्वानाच लागून राहिली आहे. विशेष म्हणजे, १५ नोव्हेंबर १९८९ याच दिवशी सचिनने कराची येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आता शुक्रवारी त्याच दिवशी सचिन कोणती करामत दाखवणार, ही सर्वामध्ये उत्सुकता आहे.