भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन आणि सध्याच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे जीवनपट चित्रपटगृहात येऊ घातले असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आधारित चित्रपट केव्हा येणार याची उत्सुकता साऱयांना होती. तशी चर्चा देखील बॉलीवूड वर्तुळात होती. मात्र, त्याबाबत खात्रीलायक माहिती आजवर समोर आली नव्हती. अखेर सोमवारी सचिन तेंडुलकरवर आधारित चित्रपट येणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास पडद्यावर उतरणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. पण येत्या १४ एप्रिलला चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.
लंडनस्थित दिग्दर्शक जेम्स अर्सकाईन हा ‘सचिन अ बिलियन ड्रीम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत असून आज या चित्रपटाचा एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. पोस्टरमध्ये येत्या १४ एप्रिलला सचिनच्या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम’चा पोस्टर समाजमाध्यमांवर झळकताच बॉलीवूड दिग्गज आणि क्रिकेटपटूंनी या चित्रपटाचे पोस्टर आपापल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केले आहे. खुद्द सचिनने देखील चित्रपटाचा पोस्टर ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. मास्टर ब्लास्टरचा जीवनप्रवास पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र, चित्रपटात सचिनच्या भुमिकेत कोण दिसणार याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.