मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांची कायम तुलना केली जाते. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. आता विराटदेखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नवनवे विक्रम करत आहे. विराट कोहली हा सचिनपेक्षा धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्यात सरस आहे, असे मत काही दिवसांपूर्वी एबी डीव्हिलियर्स याने व्यक्त केले होते. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने सचिन आणि विराट यांच्या देहबोलीतील फरक सांगितला होता. त्यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने सचिन आणि विराट यांच्यातील आपला आवडता खेळाडू कोण ते सांगितले.

सचिन आणि विराट यांच्यापैकी तुझी पसंती कोणाला असा प्रश्न माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर गंभीरने समर्पक उत्तर दिले. “नक्कीच अशा वेळी मी सचिनची निवड करेन. सध्या नव्या नियमांमुळे फलंदाजी करणे खूप सोपं झालं आहे. पण जुन्या नियमनुसार पूर्ण ५० षटके एकच चेंडू आणि सीमारेषेवर पाच फिल्डर अशी परिस्थिती असतानादेखील उत्तम कामगिरी करणाऱ्या सचिनला माझी पसंती असेल. दोघांमध्ये निवड करणे खूप कठीण आहे पण नीट विचार करायचा तर नव्या नियमांमुळे फलंदाजी करण्यात खूप सहजता आली आहे. म्हणून विराट पेक्षा सचिनला माझी पसंती आहे”, असे गंभीर म्हणाला.

काय म्हणाला होता डीव्हिलियर्स?

“सर्वच प्रकारच्या क्रिकेट प्रकारात सचिनने उत्तम कामगिरी केली आहे. कोणाचेही यात दुमत असूच शकत नाही. पण आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा दडपणाची स्थिती असते, त्यावेळी विराट सचिनपेक्षा सरस आहे असं मला वाटतं. विराट जर फलंदाजी करत असेल, तर कितीही धावसंख्या कमीच आहे”, असे डीव्हिलियर्स म्हणाला होता.

अक्रमने नोंदवलं होतं महत्वपूर्ण निरीक्षण

“सचिनला जर मी डिवचण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याने स्लेजिंगकडे लक्ष न देता खेळावर अधिक लक्ष केंद्रित केलं असतं. मला तरी सचिनबद्दल असं वाटतं. पण विराटला मात्र मी डिवचलं, तर तो मात्र चिडचिड करेल, रागावेल. जेव्हा फलंदाज रागात असतो, तेव्हा तो शक्य तितकी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळी फलंदाजाला बाद करण्याची सर्वात जास्त संधी असते”, असं निरीक्षण अक्रमने नोंदवलं होतं.