मुंबईचा संघ रणजी सामन्यात कारकिर्दीतील ५०० वा सामना खेळण्यासाठी वानखेडेच्या मैदानात उतरला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतील अविस्मरणीय रणजी सामन्यातील आठवणींना उजाळा दिला. १९९९-२००० च्या हंगामात तामिळनाडूविरुद्ध वानखेडेच्या मैदानात खेळलेला रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य सामना अविस्मरणीय असल्याचे तो म्हणाला. या सामन्यात मुंबईने तामिळनाडूने दिलेल्या ४८५ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करुन यश मिळवल होते. यावेळी मुंबईचा फलंदाज संतोष सक्सेना मैदानात होता, ही आठवण देखील त्याने सांगितली. सचिनने या सामन्यात द्विशतक झळकावले होते.

अविस्मरणीय सामन्याविषयी सचिन म्हणाला की, पंचानी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोलंदाजाला स्विंगसाठी मदत मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे क्रिजच्या बाहेर येऊन खेळण्याचे ठरवले. पण पॉईंटवर उभा असलेला हेमांग बदानी आपल्या संघातील गोलंदाजाला मी बाहेर उभा आहे, असे तमिळमध्ये सांगत होता. त्याची भाषा समजत असल्यामुळे मी गोलंदाजाच्या रनअपनंतर पुन्हा क्रिजमध्ये यायचो. सामना झाल्यानंतर तू जे तमिळमध्ये बोलत होतास ते मला समजत होते, असे बदानीला सांगितले होते. मुंबईने

तामिळनाडूविरुद्धचा हा सामना ८ गडी राखून जिंकला होता. रणजी सामन्यात मुंबईला मिळालेलं यश खूप मोठं आहे, असेही सचिन म्हणाला. या कार्यक्रमात सचिनसह माधव आपटे, अजित वाडेकर, दिलिप वेंगसकर, सुधीर नाईक, संजय मांजरेकर, अमोल मजूमदार यांनी देखील मुंबईच्या यशाची कहाणी सांगितली. भारतीय क्रिकेटमध्ये मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत मुंबईने तब्बल ४१ वेळा विजेतेपद पटकावले आहे. आज मुंबईचा संघ घरच्या मैदानावर आपल्या कारकिर्दीतला ५०० वा सामना खेळत आहे.