भारतीय संस्कृतीमध्ये गुरूशिष्य परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. आई, वडील आणि गुरू ही तीन दैवते सांगण्यात आली आहेत. गुरू आपणास ज्ञान देतो.जो जो आपणास ज्ञान देतो, तो आपला गुरूच असतो. गुरूचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या उपकारांची फेड उभ्या आयुष्यात करता येत नाही. संपूर्ण देशभरात आजच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या गुरुला वंदन करुन त्याच्याविषयी आदराची भावना व्यक्त करत असतो.

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही आजच्या दिवशी आपल्या आयुष्यातील तीन गुरुंचे आभार मानले आहेत. सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारा आपला भाऊ, आचरेकर सर आणि आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

माझ्या भावामुळे मी क्रिकेट खेळायला लागलो, प्रत्येकवेळी मी खेळण्यासाठी मैदानात उतरायचो त्यावेळी माझा भाऊही माझ्यासोबत असायचा असं मला वाटायचं. आचरेकर सरांनी लहानपणी माझी फलंदाजी सुधारावी यासाठी अनेक तास खर्च केले आहेत. वडिलांनी आयुष्यात मला नेहमी कधीही शॉर्टकटचा वापर करु नकोस असा सल्ला दिला. या तिघांमुळे आज मी यशस्वी असल्याचं सचिनने सांगितलं.