मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातील मैत्रीतील किस्से जितके गाजले तितकेच त्यांच्यातील मैत्रीतील दुराव्याची चर्चाही रंगली. मात्र, आता सचिन-कांबळी यांच्यातील नाते पुन्हा नव्याने बहरत आहे. दोघांच्यात मैत्रीचे वारे वाहत असून खुद्द विनोद कांबळीनं एका मुलाखतीत सचिनच्या गळाभेटीमुळे आनंद झाल्याचे सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रसी XI : द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनेक क्रिकेटर्स उपस्थित होते. यात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत, विनोद कांबळीने सचिनची गळाभेट घेतल्याचे सांगितले. कांबळी म्हणाला की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. नात्यातील गैरसमज दुर झाल्याने मी आनंदी आहे. आम्ही दोघांनी या कार्यक्रमात मनमुराद गप्पा मारल्या. आमच्यात ‘जे काही झालं होतं, ते सर्व आमच्यात होतं. जे काही समज-गैरसमज होते ते विसरुन आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे.

क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातील मैत्रीचे किस्से फारच चर्चेत होते. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली एकाचवेळी आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या दोंघाच्या मैत्रीत मध्यंतरी दुरावा निर्माण झाला होता. २००९ मध्ये एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात कांबळीने तेंडुलकर विरोधात वक्तव्य केल्यामुळे दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाली. ‘सच का सामना’ या कार्यक्रमात विनोद कांबळीने सचिनवर काही आरोप केले होते. सचिनने मनात आणले असते तर मी मैदानात खेळलो असतो. पण सचिनने मला मदत केली नाही, असे कांबळी म्हणाला होता. कांबळीचे हे वक्तव्य सचिनला रुचले नव्हते. परिणामी सचिनने मुंबईच्या मैदानात कारकीर्दीच्या शेवटच्या सामन्यानंतर केलेल्या भाषणामध्ये कांबळीचा खास उल्लेखही केल्याचे दिसले नाही. मात्र, आता राजदीपच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर दोघांची मैत्री पुन्हा बहरू लागलेय, असेच म्हणावे लागेल.