इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल कामगिरी करून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल उत्सुक आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीला मंगळवारी प्रारंभ होत आहे.
ऑल इंग्लंड स्पर्धेतील अंतिम लढतीत सायनाला कॅरोलिना मरीन हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता. या दोन खेळाडूंमध्ये येथे पुन्हा लढत होण्याची शक्यता आहे. सायनाला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूशी लढत द्यावी लागणार आहे. विजेतेपदाच्या मार्गात ती कॅरोलिनाचा अडथळा कसा पार करणार याचीच उत्कंठा निर्माण झाली आहे.
पुरुषांच्या एकेरीत किदम्बी श्रीकांत याला पहिल्याच फेरीत थायलंडच्या तानोनोंग्सक सेन्सोम्बुसेक या तुल्यबळ खेळाडूबरोबर झुंजावे लागणार आहे. त्याच्या विजेतेपदाच्या मार्गात द्वितीय मानांकित जान ओ जोर्गेन्सन याचा अडथळा असणार आहे. श्रीकांतने नुकतीच स्विस ओपन स्पर्धा जिंकली आहे. तसेच त्याने या मोसमात चीन ओपन स्पर्धेतही अजिंक्यपद पटकाविले आहे. या स्पर्धेत त्याने दोन वेळा ऑलिम्पिक विजेता असलेल्या लिन दान याचा पराभव केला होता. त्याने जागतिक क्रमवारीत नुकतीच चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता पारुपल्ली कश्यप याने नुकतीच सईद मोदी चषक स्पर्धाही जिंकली आहे. त्याला पहिल्या फेरीत चीन तैपेईच्या हेसु जेन हाओ याच्याशी खेळावे लागणार आहे. कश्यप याने हाओ याच्याविरुद्ध एकदा विजय मिळविला आहे, तर एकदा त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. एच. एस. प्रणोय याला इस्रायलच्या मिशा झिल्बेरमन याच्याशी खेळावे लागेल. बी. साईप्रणीतपुढे  व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन याचे आव्हान असेल. अजय जयराम याला हाँगकाँगच्या हु युआन याच्याशी, तर आनंद पवार याला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतील स्पर्धकाविरुद्ध खेळावे लागेल.