भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला करोनाची लागण झाली आहे. करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायना नेहवालनं मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. सायनाशिवाय एच. एस प्रणोयलाचाही करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

प्रसारमाध्यामांच्या वृत्तानुसार, थायलंडमध्ये सायनाचा दुसऱ्यांदा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आठवड्याभरापूर्वी सायनानं करोनावर मात करत पुन्हा सराव सुरु केला होता. करोनातून सावरल्यानंतर सायना कोर्टमध्ये परतली होती. स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या तिसऱ्या करोना चाचणीमध्ये सायनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सायनाला थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. करोना विषाणूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायनाला रुग्णालयातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. सायनाच्या संपर्कात असलेला पती पी. कश्यप यालाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

करोनामुळे जवळपास १० महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धाना सुरुवात होत आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय चमूतील दोन खेळाडूंना करोनची लागण झाली आहे. थायलंडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने चीनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जगातील अव्वल खेळाडू केंटो मोमोटा करोनाग्रस्त आढळून आल्याने जपानने अखेरच्या क्षणी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.