झंझावाती खेळासह सायनाने डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. वर्षांतले पहिले जेतेपद कमावण्यासाठी सायना आतुर आहे. स्कॉटलंडच्या कस्र्टी गिलमूरवर २१-१२, २१-७ असा सहज विजय मिळवला. अन्य लढतींमध्ये आरएमव्ही गुरुसाईदत्तने अजय जयरामवर मात करत तिसरी फेरी गाठली. पारुपल्ली कश्यपला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
सामन्याच्या सुरुवातीला सायनाला सूर गवसण्यास थोडा वेळ लागला. यामुळे गिलमूरने ६-३ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर सायनाने सलग सहा गुण पटकावत ९-६ अशी आगेकूच केली. ही आघाडी सातत्याने वाढवत सायनाने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने ६-० अशी भक्कम आघाडी घेतली. गिलमूरने मुसंडी मारत ४-९ अशी गुणसंख्या केली. मात्र सायनाने आपला खेळ उंचावत १३-४ अशी दमदार आघाडी घेतली. या आघाडीच्या आधारे वाटचाल करत दुसऱ्या गेमसह सायनाने सामन्यावर कब्जा केला.
दोन भारतीय खेळाडूंत रंगलेल्या मुकाबल्यात गुरुसाईदत्तने बाजी मारली. गुरुसाईदत्तने अजयला २१-१५, २१-१६ असे नमवले. इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेत हे दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये होते. जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असलेल्या गुरुसाईदत्तने चौफेर खेळाचे प्रदर्शन करत २५व्या स्थानी असणाऱ्या जयरामला चीतपट करत ही लढत जिंकली. स्मॅशचे फटके, नेटजवळून केलेला अचूक खेळ आणि कोर्टवरचा चपळ वावर याच्या जोरावर गुरुसाईदत्तने सरशी साधली. पुढील फेरीत गुरुसाईदत्तची चीनच्या पेंग्यु डय़ुशी लढत होणार आहे.
डेन्मार्कच्या पाचव्या मानांकित जॅन जॉरगेनसनने कश्यपला २१-११, २१-१५ असे नमवले. इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कश्यपला या लढतीत मात्र सूर गवसला नाही आणि दुसऱ्याच फेरीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.