दोन दिवसांपूर्वी महिलांच्या सांघिक बॅडमिंटन संघाला ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून दिल्यानंतर भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी एकेरी प्रकारात शानदार विजयानिशी आपल्या अभियानाला प्रारंभ केला आहे.
सहाव्या मानांकित सायनाने मकाऊच्या यू तेंग लोकचा फक्त २० मिनिटांत २१-१०, २१-८ असा सहज पराभव केला. पुढील फेरीत सायनाची इराणच्या सोराया अघाईहाजिआघाशी गाठ पडणार आहे. याचप्रमाणे आठव्या मानांकित सिंधूने १९ मिनिटांच्या लढतीत मकाऊच्या वाँग किट लेंगचा पराभव करून उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुढील फेरीत तिची इंडोनेशियाच्या एम. बेलाईट्रिक्सशी सामना होणार आहे.
‘‘हा सामना अवघड होता. परंतु मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मी फार पुढचा विचार न करता प्रत्येक सामन्याचा विचार करीत आहे,’’ असे जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असलेल्या सिंधूने सांगितले. लंडन ऑलिम्पिक विजेती आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असलेल्या लि झुरेईशी तिची पुढे गाठ पडणार आहे.
पहिल्या फेरीत आरामात विजय मिळवता आला, परंतु तिसऱ्या फेरीपासून आव्हान वाढत जाईल, असे जागतिक क्रमवारीतील सातव्या क्रमांकावरील सायनाने सांगितले. सायनाने गुरुवारी उपान्त्यपूर्व फेरी गाठल्यास तिचा चीनच्या द्वितीय मानांकित यान यिहानशी सामना होऊ शकेल. तिच्याविरुद्ध सायनाची जय-पराजयाची कामगिरी १-८ अशी खराब आहे.
‘‘यान यिहान ही आव्हानात्मक खेळाडू आहे. माझी तिच्याविरुद्धची कामगिरी फारशी चांगली नाही, हे सर्वानाच ज्ञात आहे. ती ताकदवान खेळाडू असून, कोर्टवर ती भेदक फटके खेळते. तिचे स्मॅशेस आक्रमक असतात. गेले दोन-तीन आठवडे मी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखली चांगली तयारी केली आहे. माझ्या योजनेनुसार गोष्टी घडतील, याबाबत मी आशावादी आहे,’’ असे सायनाने सांगितले.
भारताच्या तीनपैकी दोन दुहेरीतील जोडय़ांचे आव्हान संपुष्टात आले आहे. फक्त मनू अत्री आणि एस. सुमीत यांनी मात्र आगेकूच करताना मालदीवच्या सरिम मोहम्मद आणि एन. शराफुद्दीनचा १७-२, १७-२ असा पराभव केला. पुरुषांच्या दुहेरीमध्ये प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर जोडीने चीनच्या काय यून आणि फू हायफेंग जोडीकडून ८-२१, १५-२१ असा पराभव पत्करला. याचप्रमाणे महिला दुहेरीत जपानच्या द्वितीय मानांकित मियुकी माईदा आणि रेका काकीवा जोडीने प्रज्ञा गद्रे आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचा १६-२१, २१-१९़, २१-१४ असा पराभव केला.