दुखापतींमुळे यंदा मला अनेक स्पर्धामध्ये अपेक्षेइतके यश मिळविता आले नाही. त्यामुळेच पुढील वर्षी काही स्पर्धामध्ये भाग न घेता शारीरिक तंदुरुस्तीवर मी भर देण्याचा संकल्प केला आहे, असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सांगितले.
मुंबईतील एका गोल्फ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून ती उपस्थित होती. यावेळी ती म्हणाली, ‘‘यंदा मी खूपच स्पर्धामध्ये भाग घेतला होता. साहजिकच शारीरिक तंदुरुस्तीकडे अपेक्षेइतके प्राधान्य मी देऊ शकले नाही. पुढील वर्षी मी मोजक्याच स्पर्धामध्ये भाग घेणार आहे. शंभर टक्के तंदुरुस्ती ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारी तंदुरुस्ती प्राप्त करण्यासाठी मला एक महिना लागणार आहे. माझे वजनही वाढले आहे. त्याचा परिणाम माझ्या कामगिरीवर होत होता. त्यामुळे अधिकाधिक लवचिकता आणण्याचे माझे ध्येय आहे.’’
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धासारख्या महत्त्वाच्या स्पर्धा पुढील वर्षी होणार आहेत. या स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे व ते साध्य करण्यासाठी सर्वोत्तम शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे,’’ असेही सायनाने सांगितले.