फिफा विश्वचषकाची जागतिक रणधुमाळी सुरू असताना फक्त रात्रीचा जागर अनुभवत फुटबॉलमय झालेल्या भारताला सायना नेहवाल आणि पंकज अडवाणी यांनी रविवारी ‘अच्छे दिन आये है’ची प्रचिती दिली. दुखापती आणि खराब फॉर्म यांनी ग्रासलेल्या सायनाने दोन वर्षांचा दुष्काळ संपवत ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. तसेच इजिप्तमध्ये पंकज अडवाणीने जागतिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. स्नूकरच्या रेड स्वरूपाच्या स्पर्धेत पंकजचे हे पहिलेच विश्वविजेतेपद आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकानंतर दुखापती आणि खराब फॉर्मच्या गर्तेत अडकलेल्या सायना नेहवालने तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया केली. स्पेनच्या कॅरोलिन मारिनवर विजय मिळवत सायनाने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. तिने ही लढत २१-१८, २१-११ अशी जिंकली. यंदाच्या वर्षांतले सायनाचे हे दुसरे जेतेपद आहे. याआधी तिने दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. सहाव्या मानांकित सायनाने ४३ मिनिटांत कॅरोलिनचे आव्हान मोडून काढले. उपान्त्य फेरीत द्वितीय मानांकित सिझियान वाँगवर संघर्षपूर्ण विजय मिळवत सायनाने अंतिम फेरीत धडक मारली होती.
सायनाने कॅरोलिनविरुद्ध यापूर्वी एकदा सामना खेळला होता व त्यामध्ये तिने विजय मिळविला होता. त्यामुळे येथेही तिच्याविरुद्ध विजय मिळविण्याची तिला खात्री होती. पहिल्या गेममध्ये तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत ५-१ अशी आघाडी घेतली; तथापि कॅरोलिन हिने चिवट लढत देत सायनाची आघाडी ८-६ अशी कमी केली. तिने सव्‍‌र्हिसबाबत केलेल्या चुकांचा फायदा सायनाला मिळाला. सायनाकडे ११-७ अशी आघाडी होती. कॅरोलिन हिने स्मॅशिंगच्या सुरेख फटक्यांचा उपयोग करीत सायनाला झुंज दिली. १२-१७ अशा पिछाडीवरून तिने प्लेसिंगचा उपयोग करीत तीन गुणांची कमाई केली; तथापि सायनाने आघाडी कायम ठेवत ही गेम घेतली.  
दुसऱ्या गेममध्ये कॅरोलिन हिने सुरुवातीला आघाडी घेतली; तथापि सायनाने जिगरबाज खेळ केला. स्वत:ला प्रोत्साहित करताना ती एक-दोन वेळा मोठय़ाने ओरडल्यामुळे कॅरोलिन हिने पंचांकडे तक्रार केली. मात्र पंचांनी सायनास केवळ सूचना देत दोन्ही खेळाडूंना खेळ सुरू ठेवण्यास सांगितले.
सायनाने ११-४ अशी भक्कम आघाडी घेत आपली बाजू बळकट केली. तिच्या या मोठय़ा आघाडीमुळे कॅरोलिन हिच्या खेळावर अनिष्ट परिणाम होत गेला. तिच्या खेळात खूप चुका होत गेल्या. त्याचा फायदा सायनास मिळाला. १९-९ अशी आघाडी असताना सायनाने एका लाइनकॉलबाबत रिप्लेची मदत घेतली. त्या वेळी तिने मारलेले शटल हे बाजूच्या रेषेबाहेर असल्याचे दिसून आले. सायनाने आणखी एक गुण गमावला, मात्र त्यानंतर सायनाने पुढचा गुण घेत सामना जिंकला.