जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू सायना नेहवालच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या शिक्सियन वाँगने तिला २१-१५, २१-१३ असे पराभूत केले.
उपांत्यपूर्व फेरीतील सरळ लढतीत ऑल इंग्लंड विजेत्या वाँगने केवळ ४१ मिनिटांत सायनाचा पराभव केला. आतापर्यंत बारा वेळा या दोन खेळाडूंमध्ये गाठ पडली असून सायनाचा हा सहावा पराभव आहे. पहिल्या गेममध्ये सायनाने ४-२ अशी आघाडी घेत झकास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर वाँग हिने खेळावर पकड मिळविली. तिने ११-८ अशी आघाडी घेतली. सायनाने चिवट झुंज देत १४-१४ अशी बरोबरी साधली. मात्र वाँगने सलग सहा गुण घेत आपली बाजू बळकट केली. स्मॅशिंगवर आणखी एक गुण घेत तिने ही गेम घेतला.
दुसऱ्या गेममध्ये वाँग हिने ६-३ अशी आघाडी घेत दमदार सुरुवात केली. सायनाने ६-६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर १०-१० पर्यंत बरोबरी होती. तथापि वाँग हिने चतुरस्र खेळ करीत सायनाची दमछाक केली. ही गेम घेत तिने सामन्यावर विजयाची मोहोर नोंदविली.
सायना आता २ जूनपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशियन खुल्या सुपरसीरिजमध्ये सहभागी होणार आहे.