आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या भरगच्च वेळापत्रकाचा तंदुरुस्तीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सायना नेहवालने सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सायनाच्या अनुपस्थितीत पी.व्ही.सिंधू महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता होती. मात्र दुखापतीमुळे महिनाभर कोर्टपासून दूर असलेल्या सिंधूचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे.
प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर घरच्या मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यासमोर खेळताना सायनाने जेतेपदावर कब्जा केला होता. या स्पर्धेदरम्यानच सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. यानंतर लगेचच झालेल्या मलेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. गुडघे तसेच पायाच्या दुखापतींनी सायना याआधी सतवले होते. ऑल इंग्लंड स्पर्धेनंतर खांद्यामध्ये त्रास जाणवत असल्याचे सायनाने सांगितले होते. मात्र तरीही दिल्लीत झालेल्या स्पर्धेत ती सहभागी झाली होती. मात्र दुखापतींसह खेळण्यापेक्षा काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय सायनाने घेतला आहे.
‘‘मागचा महिना दगदगीचा होता. मी तीन स्पर्धा खेळले आणि त्यापैकी दोन स्पर्धामध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मला स्वत:वर स्पर्धाचे ओझे लादायचे नाहीये. हे वर्ष माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. सिंगापूर स्पर्धेतून विश्रांती घेत आठवडाभर सराव करण्याचा माझा प्रयत्न असेल. या सरावाच्या बळावर मी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत खेळेन,’’ असे सायनाने सांगितले.
दरम्यान, दुखापतीतून सावरणाऱ्या सिंधूने सरावाला सुरुवात केली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची ती घाई करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २१ ते २६ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू खेळण्याची शक्यता आहे.
सायना, सिंधूच्या अनुपस्थितीत युवा किदम्बी श्रीकांतवर बॅडमिंटन चाहत्यांच्या अपेक्षा केंद्रित झाल्या आहेत. स्विस खुली स्पर्धा आणि भारतीय खुली सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदांवर नाव कोरणाऱ्या श्रीकांतचा सलामीचा मुकाबला व्हिएतनामच्या तिइन मिन्ह न्युगेनशी होणार आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपसमोर कोरियाच्या ली ह्य़ुआनचे आव्हान असणार आहे. एच. एस. प्रणॉयची लढत हाँगकाँगच्या वोंग विंगशी होणार आहे. महिलांमध्ये पी.सी. तुलसी भारताची एकमेव प्रतिनिधी असणार आहे. तुलसीची सलामीची लढत डेन्मार्कच्या लिन जेआर्सफेल्डटशी होणार आहे. महिला दुहेरीत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीचा मुकाबला कोरियाच्या गो आह रा आणि यो हुई वोन जोडीशी होणार आहे.