भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू साईप्रणितने पुढील महिन्यात होणाऱ्या थॉमस चषक आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघा दुखापतीमुळे ही माघार घेत असल्याचे साईप्रणितने स्पष्ट केले.

‘‘मी नुकतीच ६ सप्टेंबरला सरावाला सुरुवात केली. मात्र माझा गुडघा दुखत असल्याचे जाणवल्याने मला विश्रांतीची गरज आहे. सरावदेखील मी कमी प्रमाणात करत आहे. मात्र मोठय़ा स्पर्धेत खेळण्याचा धोका मला पत्करता येणार नाही,’’ असे साईप्रणितने सांगितले. ‘‘मोठय़ा स्पर्धामध्ये खेळण्यासाठी अवघा अडीच आठवडय़ांचा सराव पुरेसा नाही. या स्थितीत थॉमस आणि डेन्मार्क येथील स्पर्धेत खेळणार नाही. कदाचित आगामी युरोपमधील स्पर्धामध्ये माझ्या सहभागाची शक्यता कमी आहे. मी त्याऐवजी आशिया स्पर्धेच्या पात्रता फेरीवर लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे साईप्रणितने स्पष्ट केले.

पी. व्ही. सिंधूने नुकतेच उबेर चषकासाठी ती उपलब्ध असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता साईप्रणितने माघार घेतल्याने थॉमस चषकात पुरुष एकेरीची भिस्त किदाम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांच्यावर आहे.