साकेत मायनेनी, भारताचा टेनिसपटू

ऋषीकेश बामणे

युवा पिढीला टेनिससारख्या महागडय़ा खेळाकडे अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि कार्यप्रणालीमध्ये बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत भारताचा टेनिसपटू साकेत मायनेनीने व्यक्त केली. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा आणि क्रोएशियाविरुद्धच्या डेव्हिस चषकातील लढतीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठीही मी इच्छुक आहे, असेही साकेतने सांगितले. ३२ वर्षीय साकेत सोनी ईएसपीएन वाहिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या टेनिस प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. यानिमित्ताने साकेतशी केलेली ही खास बातचीत-

* पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीतील भारताच्या कामगिरीबाबत तू काय सांगशील?

भारतीय टेनिसपटूंचा दर्जा कोणत्या उंचीवर आहे, हे या स्पर्धेद्वारे सहज स्पष्ट झाले. चारही लढतींमध्ये आपल्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. परंतु या लढतीला दोन्ही देशांतील परस्पर संबंधाचे गालबोट लागले. खेळामध्ये अशा गोष्टींचा समावेश होऊ नये, असे मला वाटते.

* सध्या तू कोणत्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करतो आहेस?

टेनिस प्रीमियर लीग संपल्यानतर किमान पुढील तीन आठवडे मी स्पर्धात्मक सामन्यांपासून दूर राहणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आणि मार्चमध्ये रंगणाऱ्या क्रोएशियाविरुद्धच्या डेव्हिस चषकातील लढतीत मला नक्कीच भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. क्रोएशिया हा एक बलवान संघ आहे आणि त्यांच्याच भूमीत त्यांना हरवणे फार आव्हानात्मक असेल. त्यामुळे क्रोएशियाला नमवून जागतिक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी आम्ही सर्वच उत्सुक आहोत. याचप्रमाणे तंदुरुस्ती सुधारण्यावर मी आगामी काळात अधिक भर देणार आहे. माझे तंदुरुस्ती मार्गदर्शक सातत्याने मला मार्गदर्शन करणार असल्याने नवीन वर्षांत अधिक दमदार कामगिरी करून क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी मी प्रयत्न करेन.

* टेनिसच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणत्या बदलांची गरज आहे?

निश्चितच पायाभूत सुविधांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सुधारणेला वाव आहे. याची सुरुवात खेळाविषयी संपूर्ण माहिती असलेल्या अनुभवी प्रशिक्षकांच्या नेमणुकीपासून करायला पाहिजे. तसेच आपल्याकडे अनेक उदयोन्मुख खेळाडू आहेत. परंतु त्या खेळाडूंना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याकडे अचूक कार्यप्रणालीच नाही. १२, १४, १६ या वयोगटांतील खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. त्यांना पुरेसे आर्थिक पाठबळ आणि दोन्ही गटांतील खेळाडूंना समसमान पारितोषिके देणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत या पातळीतील कारभारात पारदर्शकता येणार नाही, तोपर्यंत आपल्याला अनेक गुणवान खेळाडूंना गमवावे लागेल, हे मी निश्चितपणे सांगू शकतो.

* भारताची टेनिसमधील सद्य:स्थिती आणि युवा पिढीविषयी तू काय सांगशील?

प्रज्ञेश गुणेश्वरन, युकी भांब्री, सुमित नागल, अंकिता रैना यांच्यासारख्या खेळाडूंमुळे पुढील काही वर्षे तरी भारतीय टेनिस सुरक्षित हातात आहे, असे मला वाटते. टेनिस प्रीमियर लीग आणि देशांतर्गत अन्य स्पर्धामुळे १८-२५ या वयोगटातीलही अनेक खेळाडू गेल्या काही वर्षांत उदयास आले आहेत. मात्र ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू घडवण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागेल. किशोरवयीन गटापासूनच खेळाडूच्या तंत्रावर परिश्रम घेतले तर भारतालाही भविष्यात ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू लाभतील. त्याशिवाय खेळाडूंच्या पालकांचा दृष्टिकोनही यामध्ये निर्णायक भूमिका बजावतो, असे मला वाटते. कारण आर्थिक पाठबळ आणि कुटुंबीयांच्या सहकार्याशिवाय या खेळात प्रगती करणे आव्हानात्मक आहे.