लॉकडाउन पश्चात आंतरराष्ट्रीय क्रिकेटची रखडलेली गाडी पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. यामध्ये चेंडूला चकाकी आणण्यासाठी गोलंदाजांना लाळ किंवा थुंकीचा वापर करता येणार नाहीये. प्रादूर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय आयसीसीने घेतला आहे. मात्र अनेक गोलंदाजांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. जलदगती गोलंदाज चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करतात. मात्र युजवेंद्र चहलच्या मते, फिरकीपटूंसाठी लाळेचा वापर करणं तितकच महत्वाचं असतं.

“वन-डे, टी-२० क्रिकेटचा विचार केला तर लाळेचा वापर न करणं यामुळे फिरकीपटूंचंही नुकसान होणार आहे. लाळ वापरायची नसेल तर फिरकीपटूंना ‘ड्रिफ्ट’ मिळणार नाही. लाळ किंवा थुंकीचा वापर केल्यानंतर जलदगती गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यासाठी मदत मिळते तर फिरकीपटूंना ड्रिफ्ट मिळते. (धीम्या गतीचे गोलंदाज हवेच्या मदतीने चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतात त्याला क्रिकेटच्या भाषेत ड्रिफ्ट असं म्हटलं जातं.) ही ड्रिफ्ट मिळणार नसेल तर फलंदाजासाठी सर्व गोष्टी सोप्या होतील. प्रत्येक गोलंदाजाला याचा तोटात होणार आहे. जोपर्यंत मी नेट्समध्ये सरावाला सुरुवात करत नाही, तोपर्यंत यावर उपाय काढता येणार नाही.” चहल ESPNCricinfo शी बोलत होता.

अनेकदा फिरकीपटूही गोलंदाजीदरम्यान चेंडूला लाळ लावतात. आमच्यानंतर एखादा जलदगती गोलंदाज दुसऱ्या दिशेने गोलंदाजी करणार असतो. त्यामुळे त्याला मदत मिळण्यासाठी आम्हीही अनेकदा लाळेचा वापर करतो, चहल बोलत होता. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मानेही आयसीसीच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा – आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयावर इशांत म्हणतो, स्पर्धा बरोबरीची व्हायला हवी !