संदीप लामिचेनने आयपीएलच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारा संदीप हा पहिला नेपाळी क्रिकेटपटू ठरला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यासाठी २० लाख रूपयांची बोली लावली. सतरा वर्षीय संदीपने ९ सामने खेळले असून तो लेगब्रेक गुगली गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल क्लार्कला संदीपकडून अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे. संदीप हा क्लार्कच्या मुशीतच तयार झाला आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला हाँगकाँगमध्ये त्याला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. त्याच्यात उच्च गुणवत्ता आहे, असे गौरवोद्गार क्लार्कने काढले आहेत. संदीप हा एक उत्कृष्ठ क्रिकेटपटू असून तो आपल्या खेळाचा आनंद घेतो. अत्यंत प्रतिभाशाली खेळाडुला मिळालेली ही महत्वाची संधी असल्याचे तो म्हणाला.

बांगलादेश येथे २०१६ साली झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सर्वांधिक बळी घेण्यामध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने १४ बळी घेतले होते. ५ गड्यांच्या बदल्यात २७ विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू व महान लेगस्पिनर शेन वॉर्ननेही त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.

दिल्ली डेअरडेव्हिल्सने संदीपसाठी २० लाखांची बोली लावली. त्यांनी संदीपचे स्वागत केले असून आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एक नेपाळी खेळाडू खेळत असल्याचे दिल्ली डेअरडेव्हिल्सने ट्विट केले आहे.