News Flash

पत्रकार परिषदेत चिडलेल्या विराटला संजय मांजरेकरांनी दिला सल्ला; म्हणाले…

धोनीकडून शिकण्याचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून संयम शिकला पाहिजे असा सल्ला दिला आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने मैदानाबाहेर सुरु असलेली चर्चा आपल्यासाठी मूर्खपणापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं.

विराट कोहलीला पत्रकार परिषदेत सध्या फॉर्ममध्ये नसणाऱ्या के एल राहुलसंबंधी विचारण्यात आलं. यावर त्याने सांगितलं की, मैदानाबाहेर सुरु असलेला मूर्खपणा आपण ड्रेसिंग रुममध्ये येऊ देणार नाही. विराटने यावेळी भारतीय खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा दिला जाईल तसंच त्यांना मानसिक स्वास्थ राखण्यासही मदत केली जाईल असंही सांगितलं.

“जेव्हा एखादी व्यक्ती कठीण टप्प्यातून जात असते तेव्हा याचा अर्थ ती खेळण्यास विसरली असा होत नाही, तर त्यावेळी त्याच्याकडे स्पष्टतेचा अभाव आहे असा होतो. त्यावेळी जर तुम्हाला काय गोष्टी बोलल्या जात आहेत आणि तुम्ही फॉर्ममध्ये नसल्याचं सांगितलं जात असेल तर तुम्ही आहे त्यामध्ये अजून भर टाकत आहात,” असं सांगत विराटने के एल राहुलला पाठिंबा दर्शवला.

“हा सोपा खेळ आहे. तुम्हाला चेंडू पाहून प्रतिक्रिया द्यायची असून त्या चेंडूला टोलवायचं आहे. तुम्ही त्या क्षणात असं पाहिजे. आणि खरं सांगायचं तर मैदानाबाहेर जी काही चर्चा सुरु असते तो सगळा मूर्खपणा असतो,” असं विराटने म्हटलं आहे. करिअरच्या पहिल्या दिवसापासून माझ्यासाठी मैदानाबाहेरील ही चर्चा मूर्खपणा राहिली आहे असंही त्याने सांगितलं.

दरम्यान संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीने लोक कामगिरी पाहून व्यक्त होतात हे सत्य स्वीकारलं पाहिजे असं म्हटलं आहे. विराट कोहलीने टीका हाताळताना महेंद्रसिंग धोनीप्रमाणे संयम आणि परिपक्वता दाखवली पाहिजे असा सल्ला दिला आहे.

“मैदानाबाहेरील चर्चा ज्याला विराट कोहली मूर्ख म्हणत आहे ती लोकांची कामगिरीवर प्रतिक्रिया आहे. नेहमीपासून हे असंच चालत राहिलं आहे. चांगली कामगिरी केली की कौतुक आणि नसेल तेव्हा टीका, विराटने गेल्या कित्येक वर्षांपासूनच हे सत्य संयम आणि परिपक्वता दाखवत स्वीकारलं पाहिजे….ज्याप्रमाणे धोनीने केलं,” असं ट्विट संजय मांजरेकर यांनी केलं आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये मंगळवारी पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. विराट कोहलीने रोहित शर्मा आणि शिखऱ धवन इनिंगची सुरुवात करतील असं स्पष्ट केलं आहे. के एल राहुलला संधी मिळते का हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 11:01 am

Web Title: sanjay manjrekar on virat kohli view on outside talk ms dhoni sgy 87
Next Stories
1 सलामीच्या शर्यतीत धवनला प्राधान्य
2 युवा नेमबाजांचा सुवर्णवेध!
3 ऑलिम्पिक पात्रतेसाठी श्रीकांतची अग्निपरीक्षा
Just Now!
X