भारताचा माजी कप्तान व शैलीदार डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीनं विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. विराट कोहली हा फॅब्युलस फोर या नावाजलेल्या चौकडीच्या पंक्तीत बसण्यायोग्य असल्याचे मत गांगुलीनं व्यक्त केलं आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हि.व्हि.एस लक्ष्मण व विरेंद्र सेहवाग या चौकडीचा उल्लेख गांगुलीनं फॅब फोर असा केला असून कोहलीचा दर्जाही या चौघांच्या पंक्तित बसण्याएवढा असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.

कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये सडकून हरल्यानंतर भारतीय संघानं उसळी घेतली असून त्यामध्ये कोहलीचा वाटा सिंहाचा राहिला आहे. तिसऱ्या कसोटीमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या वाँडरर्सवर कोहलीनं 54 व 41 धावा करताना खेळपट्टीवर पाय रोवले. त्यानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटनं 112, 46 व 160 अशा दावा करत एकदिवसीय मालिकेत 3 – 0 आघाडी घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

एका वृत्तपत्राच्या स्तंभामध्ये लिहिताना गांगुलीनं कोहलीमध्ये असलेला प्रचंड उत्साह व प्रत्येक सामन्यात दिसलेला त्याची एकाग्रता यांचं कौतुक केलं आहे. कसोटी मालिका हरल्यानंतर सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये 3 – 0 अशी आघाडी घेणं ही महान कामगिरी असल्याची दाद गांगुलीनं दिली आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हि.व्हि.एस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, रिकी पाँटिंग व ब्रायन लारा यांच्यासारख्या महान खेळाडूंबरोबर तसेच समोर खेळण्याची संधी मिळाल्याने आपण खूपच भाग्यवान असल्याचे 311 एकदिवसीय व 113 कसोटी सामने खेळलेला गांगुली विनयानं म्हणतो. तसेच या महान खेळाडुंच्या पंक्तित बसण्याची पात्रता विराटनं मिळवली असल्याचंही गांगुलीनं नमूद केलं आहे.

प्रत्येक सामन्यामध्ये दिसत असलेला विराटचा उत्साह आणि एकाग्रता थक्क करणारी असल्याचं गांगुलीनं म्हटलं आहे. करीअरच्या इतक्या कमी कालावधीत 34 शतकं झळकावणं हे या विश्वातलं प्रकरण नसल्याचं गांगुली म्हणतो. दुसऱ्या कुठल्याही भारतीय फलंदाजानं या दौऱ्यात शतक झळकावलेलं नाही व फक्त एका दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजानं झळकावलेलं आहे हे लक्षात घेता विराटची दोन शतकं खूर काही सांगून जातात. अर्थात, त्याला आणखी पल्ला गाठायचा असल्याचंही गांगुलीनं म्हटलं आहे.