आतापर्यंतच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीतील १९९९ साली झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका Australia Series सर्वात आव्हानात्मक होती, अस मत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.

‘१९९९ साली भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता आणि त्यांचा संघ बलाढय़ होता. या ऑस्ट्रेलियाच्या संघाने बरीच वर्षे क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवले होते. त्यांची खेळण्याची स्वत:ची एक शैली होती, जी फारच आक्रमक होती. त्यांनी अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे जो खेळ केला, त्याने क्रिकेट विश्वावर गारूड केले होते. प्रत्येकाला त्यांच्या शैलीतील खेळ करायचा होता. आमची शैलीही चांगली होती, पण त्यांची शैली काही खासच होती. ते आपल्या शैलीत सातत्यपूर्ण कामगिरी करत होते, त्यामुळे त्यांना क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवता आले,’ असे सचिन म्हणाला. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका होती. स्टीव्ह वॉ यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारतावर ३-० असा विजय मिळवला होता.

तो पुढे म्हणाला की, ‘१९८९ साली मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या कालावधीत मी जवळपास २५ जगप्रसिद्ध गोलंदाजांचा सामना केला. पण या साऱ्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएची गोलंदाजी खेळणे मला फार कठीण गेले. एकेकाळी अ‍ॅलन डोनाल्ड आणि शॉन पॉलक यांची गोलंदाजी खेळणे मला कठीण गेले नाही. पण क्रोनिए गोलंदाजीला आल्यावर त्याचा सामना करावा लागू नये, असे मला वाटायचे.