भारताने विंडीजविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. या मालिकेत भारताने सर्व आघाड्यांवर वर्चस्व राखले. पण गेल्या काही दिवसापासून भारतीय खेळाडूंना एक वेगळीच चिंता सतावते आहे. कुलदीप आणि उमेश यादवच नव्हे तर विराट कोहली आणि आघाडीचा फिरकीपटू आर अश्विननेही या SG चेंडूच्या वापरावरून आणि त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विराटने तर या चेंडूऐवजी ड्युक्सचा चेंडू वापरावा असेही सुचवले होते. मात्र माजी कर्णधार अझरुद्दीन हा या साऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नाराज झाला आहे. अचानक २५ वर्षांनंतर SGच्या चेंडूंबाबत खेळाडूंना अडचण वाटणे हे अत्यंत अनाकलनीय आहे, असे तो म्हणाला आहे.

केवळ पाच षटकांच्या खेळानंतर जर चेंडू खराब होत असेल तर त्याला काही अर्थ नाही. पूर्वी या चेंडूने खेळले जायचे तेव्हा या चेंडूचा दर्जा चांगला होता. पण आता त्याचा दर्जा बिघडल्याचे दिसत आहे. आताच असे का होत आहे ते कळत नाही. ड्युक्स आणि कुकाबरा चेंडूचा दर्जा असूनही चांगला आहे. कुकाबरा चेंडूने खेळण्यात काही निर्बंध येतात, पण त्याच्या दर्जामध्ये कधीही घसरण होत नाही, असे विराट म्हणाला होता.

त्यावर अझरने नाराजी व्यक्त केली आहे. १९८४-८५पासूनचे सामने आठवायचे झाले तर या सामन्यांमध्ये ड्युक्सच्या चेंडूची शिवण खराब होणे ही नेहमीची अडचण असायची. भारतातील खेळपट्यांवर ड्युक्स चेंडू फारसे प्रभावशाली ठरत नाहीत, हे तेव्हाच समजले होते. १९९३ला पहिल्यांदा SG चेंडू वापरण्यात आला आणि भारताला घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करता येऊ लागली. विविध वातावरणात विविध चेंडूंनी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजानाची सरासरी पाहिली तर याबाबतचे तथ्य लक्षात येईल. त्यामुळे या सर्व तक्रारी कशासाठी?, असा सवालदेखील त्याने उपस्थित केला.