टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने जागतिक टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ICC ने महिला टी २० क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. यात शफाली तब्बल १९ स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली. तिने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्स हिला मागे टाकले. सुझी बेट्स हिची एका स्थानाने घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानी घसरली. उपांत्य फेरीच्या तोंडावर शफालीला ही ‘गुड न्यूज’ मिळाली. मात्र त्याचे सेलिब्रेशन न करता शफालीने सरावावर लक्ष केंद्रित केले.

‘वर्माजी की बेटी’ जगात भारी; १६ व्या वर्षी शफाली नंबर वन!

T20 World Cup या ट्विटर हँडलवरून शफालीच्या सरावाचा एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्यात शफाली आपल्या सहकाऱ्यांसोबत फलंदाजी सराव करताना दिसते आहे. शफाली त्या व्हिडीओमध्ये मैदानी आणि हवेतील फटके खेळण्याचा सराव करत आहे.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, शफालीने ७६१ गुणांकासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ऑक्टोबर २०१८ पासून अव्वलस्थानी असलेल्या सुझी बेट्सचे संस्थान तिने खालसा केले. यासह महिला आणि पुरूष अशा दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून टी २० जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शफाली सर्वात तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरली. याशिवाय भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर टी २० क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.

Video : पांड्या Returns! १० उत्तुंग षटकारांसह ३७ चेंडूत ठोकलं शतक

शफालीचा टी २० क्रिकेटमधील प्रवास

रोहतकची शफाली हिने अवघ्या सहा महिन्यात टी २० क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. सप्टेंबर २०१९ मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरत येथून आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली. आतापर्यंत शफालीने १८ टी २० सामन्यात २८ च्या सरासरीने ४८५ धावा केल्या आहेत. तिने १४६.९६ च्या स्ट्राईक रेटने खेळताना २ अर्धशतके झळकावली आहेत.