बुडापेस्ट : भारताच्या अचंता शरथ कमाल आणि जी. साथियन यांनी हाँगकाँगच्या अव्वल मानांकित क्वाट किट हो आणि चून टिंग वाँग यांना पराभवाचा धक्का देत ‘आयटीटीएफ’ वर्ल्ड टूर हंगेरी खुल्या टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात शरथ-साथियन जोडीने ११-७, १२-१०, ४-११, ४-११, ११-९ असा विजय मिळवला. त्यांना आता विजेतेपदासाठी जर्मनीच्या डुडा बेनेडिक्ट आणि फ्रान्झिस्का पॅट्रिक यांच्याशी लढत द्यावी लागेल.

त्याआधी, मनिका बात्राने जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या चेन झू-यू हिला ४-३ (९-११, ४-११, ७-११, १२-१०, ११-९, ११-७, १४-१२) असे पराभूत केले.

साथियन याने जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानी असलेल्या इराणच्या नोशाद अलामियान याला सहजपणे ४-० अशी धूळ चारली. साथियनने हा सामना ११-६, ११-६, ११-९, ११-२ असा आरामात जिंकत पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.