इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विजेतेपद बहाल करण्यात आलं. निर्धारित वेळेत आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यामुळे आयसीसीने चौकारांच्या निकषाचा नियम लावला. मात्र यासाठी आयसीसीला चाहत्यांचा रोष पत्करावा लागला. यानंतर आयसीसीने नियमांमध्ये बदल करुन, निकाल लागेपर्यंत उपांत्य आणि अंतिम सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र न्यूझीलंड क्रिकेट संघाचा ज्येष्ठ खेळाडू रॉस टेलरच्या मते वन-डे क्रिकेटमध्ये सुपर-ओव्हरच्या नियमाची गरज नाही. अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास विजेतेपद विभागून देता येईल. तो ESPNCricinfo शी बोलत होता.

“वन-डे सामन्यात सुपर ओव्हरच्या नियमाबद्दल मी अजुनही साशंक आहे. गेली अनेक वर्ष वन-डे क्रिकेट सुरु आहे, त्यामुळे एखादा सामना जर बरोबरीत सुटणार असेल तर त्याला बरोबरीत सुटू द्यावं. माझी याला काही हरकत नाही. टी-२० क्रिकेट हा झटपट आटोपणारा सामना आहे, आणि त्यात सुपर ओव्हरचा नियम समजू शकतो. पण माझ्या मते वन-डे क्रिकेटमध्ये या नियमाची गरज नाही. एखादा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना विजेतेपद विभागून देता येईल.” टेलरने आपलं मत स्पष्ट केलं.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान मी पंचांशी हात मिळवायला गेलो होतो, पण नंतर मला समजलं की सुपर ओव्हर खेळवणार आहे. वन-डे क्रिकेटमध्ये १०० षटकांनंतर जर सामन्याचा निकाल बरोबरीत लागणार असेल तर दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. यावर अनेकांची वेगळी मतं असू शकतात. पण माझ्या मते सामना बरोबरीत सुटत असल्यास विजेतेपद विभागून देणं हा योग्य पर्याय आहे. २०१९ वन-डे विश्वचषकानंतर न्यूझीलंडच्या संघाला सोशल मीडियावर चाहत्यांनी सहानुभूती दर्शवली होती.