करोनामुळे सध्या जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद झालेल्या आहेत. या काळात अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी गप्पा मारत क्रिकेटचा माहोल कायम ठेवत आहेत. या गप्पांदरम्यान अनेक खेळाडूंची गुपितंही समोर आली आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरशी गप्पा मारल्या. यावेळी रोहित शर्माने आपला सहकारी शिखर धवनला कधीही सलामीचा चेंडू खेळायचा नसतो असं म्हटलं होतं. रोहितच्या या आरोपांवर शिखरने आपली बाजू मांडली आहे.

“२०१३ साली मी भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. त्या वर्षी मी आणि रोहित पहिल्यांदा सलामीची जोडी म्हणून मैदानात उतरलो. त्या सामन्यात रोहित शर्माने स्ट्राईक घेतली आणि त्यानंतर जेव्हा-जेव्हा आम्ही एकत्र खेळत होतो त्यावेळी तो अलिखीत नियमच बनला. रोहित स्ट्राईकला यायला लागला. पण ज्यावेळी रोहित सोबत नसतो आणि माझा सहकारी एखादा तरुण खेळाडू असेल…आणि तो स्ट्राईक घ्यायला तयार नसेल तर मी स्ट्राईक घेतो.” इरफान पठाणशी बोलत असताना शिखरने आपली बाजू मांडली.

दरम्यान, देशातली सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे. याचसाठी स्पर्धा रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआयकडून सुरु आहे. शिखर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.