सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर यांच्यात मैदानावर रंगलेली जुगलबंदी सर्वश्रुत आहे. सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न प्रवर्तक असलेल्या ‘क्रिकेट ऑल स्टार्स ट्वेन्टी-२०’ मालिकेत शोएब सचिनच्या संघाचा भाग आहे. ‘‘सचिनच्या संघात निवड झाली हे माझे सुदैव आहे, त्याच्याविरुद्ध १५ वर्षे गोलंदाजी केली. आता पुन्हा नको,’’ अशा शब्दांत शोएबने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो पुढे म्हणाला, ‘सचिन हा सार्वकालीन महान खेळाडू आहे. त्याचे क्रिकेटला योगदान अमूल्य आहे. पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सदृश द्वंद्व अनुभवण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या संघाचा भाग व्हायला मिळणे सन्मान आहे’. भारत-पाकिस्तान मालिकेचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी भूमिका अख्तरने मांडली.