News Flash

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका : एकदिवसीय क्रिकेटमध्येही श्रेयस चौथ्या स्थानासाठी योग्य!

भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचे मत

| December 14, 2019 03:28 am

श्रेयस अय्यर

भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचे मत

नवी दिल्ली : श्रेयस अय्यरने ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांत चौथ्या क्रमांकावर आतापर्यंत उत्तम फलंदाजी केली असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतसुद्धा त्याने याच स्थानावर फलंदाजी करावी, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने शुक्रवारी व्यक्त केली. याव्यतिरिक्त गोलंदाजांना एकदिवसीय मालिकेत बळी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, असेही कुंबळेने सांगितले.

भारत-विंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला रविवारपासून चेन्नई येथील लढतीने प्रारंभ होणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर कुंबळे म्हणाला की, ‘‘शिखर धवन दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याने लोकेश राहुल सलामीला येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर भारताने अधिक पर्यायांची चाचपणी न करता थेट श्रेयसला संधी द्यावी.’’

‘‘बांगलादेश आणि विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत श्रेयसला जेव्हाही संधी मिळाली त्याने स्वत:चे कौशल्य दाखवून दिले. त्यामुळेच त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मला आवडेल. परिस्थितीनुसार संयमी आणि आक्रमक खेळ करण्याची कला श्रेयसला अवगत आहे,’’ असेही कुंबळेने सांगितले.

ट्वेन्टी-२० मालिकेत भारताच्या गोलंदाजांनी तिन्ही सामन्यांत भरपूर धावा बहाल केल्या. परंतु एकदिवसीय मालिकेत भारतीय गोलंदाजांसमोरील आव्हान अधिक खडतर असेल, असे कुंबळेला वाटते. ‘‘विंडीजकडे धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे. त्यांचा जवळपास प्रत्येकच फलंदाज षटकार लगावण्यावरच विश्वास ठेवतो. त्याशिवाय एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आलेल्या सर्वच खेळपट्टय़ांवर धावांचा वर्षांव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या गोलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल,’’ असे १३२ कसोटी आणि २७१ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कुंबळेने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 3:28 am

Web Title: shreyas iyer should bat at no 4 in odis says anil kumble zws 70
Next Stories
1 दुबेकडे दर्जेदार अष्टपैलू खेळाडूची क्षमता -अरुण
2 तंदुरुस्ती सिद्ध करण्याचे बुमरापुढे आव्हान
3 जागतिक बॅडमिंटन मालिकेचा अंतिम टप्पा : अखेर सिंधूला विजयाचा दिलासा
Just Now!
X