तिसऱ्या कसोटीवर भारत ‘अ’ संघाचे नियंत्रण घट्ट

भारत-विंडिज ‘अ’ क्रिकेट मालिका

तरौबा (त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो)

शुभमन गिल (नाबाद २०४) प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक नोंदवणारा भारताचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने कर्णधार हनुमा विहारीच्या (नाबाद ११८) साथीने महत्त्वाची भागीदारी करून वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत ‘अ’ संघाला सुस्थितीत राखले आहे.

भारताचे भविष्यातील आशास्थान म्हणून पाहिल्या जाणाऱ्या १९ वर्षीय गिलने २५० चेंडूंत नाबाद २०४ धावांची खेळी साकारून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा विक्रम मोडीत काढला. २०व्या वर्षी गंभीरने २००२ मध्ये अध्यक्षीय संघाकडून खेळताना झिम्बाब्वेविरुद्ध २१८ धावांची खेळी उभारली होती.

भारताने ३ बाद २३ धावसंख्येवरून डावाला पुढे प्रारंभ केला. मग शाहबाझ नदीम १३ धावांवर माघारी परतल्यावर गिलने विहारीच्या साथीने नाबाद ३१५ धावांची भागीदारी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना झगडायला लावले. गिलचे द्विशतक पूर्ण होताच भारताने ४ बाद ३६५ धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. मग विजयासाठी ३७३ धावांचे आव्हान असलेल्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात बिनबाद ३७ धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’ (पहिला डाव) : २०१

वेस्ट इंडिज ‘अ’ (पहिला डाव) : १९४

भारत ‘अ’ (दुसरा डाव) : ९० षटकांत ४ बाद ३६५ डाव घोषित (शुभमन गिल नाबाद २०४, हनुमा विहारी नाबाद ११८; चेमार होल्डर २/८८)

वेस्ट इंडिज ‘अ’ (दुसरा डाव) : १५ षटकांत बिनबाद ३७ (जेरेमी सोलोझानो खेळत आहे २०.)

शुभमन गिल २०४

चेंडू     २४८ चौकार     १९  षटकार  २