मुंबईच्या सिंध क्रिकेट क्लबने नाशिक क्रिकेट अकादमीवर ८५ धावांनी मात करून येथे आयोजित समर ऋषिकेश क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

नाशिक क्रिकेट अकादमीच्या वतीने येथील भोसला क्रीडा मैदानावर आयोजित स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. सिंध क्रिकेट क्लबचा कर्णधार जावेद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अकादमीच्या गोलंदाजीसमोर सिंधचे सहा गडी केवळ ६४ धावात गारद झाले. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या कर्णधार जावेद खानने आक्रमण हाच उत्कृष्ठ बचाव या तत्वानुसार गोलंदाजांवर घणाघाती हल्ला करत केवळ ४० चेंडूत ९६ धावा फटकावताना १० षटकार व चार चौकार तडकावले. त्याला प्रतिक सिंग (३५), अल्पेश रामजानी (४०) यांनी चांगली साथ दिली. सिंध क्लबने ४५ षटकात सर्व बाद २८७ धावांपर्यंत मजल मारली. अकादमीस १२ धावांचा दंड देण्यात आल्याने त्या सिंधच्या खात्यात जमा होऊन धावसंख्या २९९ पर्यंत गेली. अकादमीकडून प्रविण अहिरेने भेदक मारा करत ४० धावांमध्ये चार गडी गारद केले. ३०० धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना अकादमीचे खेळाडू ठराविक अंतराने बाद होत गेले. एका बाजुने गणेश साकेने पाच षटकार व १३ चौकारांच्या सहाय्याने ७६ चेंडूत झंझावती शतकी खेळी केली. त्याला प्रविण अहिरेने ३१ चेंडूत ४३ धावा फटकावत चांगली साथ दिली. परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने अकादमीला ८५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

पारितोषिक वितरण मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्रवीण बर्वे यांच्या हस्ते झाले. सिंध संघाचा कर्णधार जावेद खान यास मालिकावीर, स्पर्धेत सर्वोत्तम फलंदाज गणेश साके, सर्वोत्तम गोलंदाज अक्षय घोरपडे  यांना गौरविण्यात आले.