ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या मोहम्मद सिराजला शुक्रवारी पितृशोक झाला. दुखा:चा डोंगर कोसळला असतानाही राष्ट्रहितासाठी सिराजनं प्राधान्य दिलं. या निर्णयावर देशभरातून सिराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी शनिवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून त्यामध्ये त्यांनी सिराजनं राष्ट्रहितासाठी प्राधान्य दिल्याचं सांगितलं. ‘‘फुप्फुसांच्या आजारामुळे सिराजच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. याबाबत ‘बीसीसीआय’ने त्याच्याशी चर्चा केली. त्याच्यासमोर भारतात परतण्याचा पर्याय ठेवण्यात आला. मात्र त्याने भारतीय संघासमवेत राहण्याचा निर्णय स्पष्ट केला,’’ असे शाह यांनी सांगितले. कठीण प्रसंगातही देशहिताला प्राधान्य देणाऱ्या सिराजचे ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने ‘ट्विटर’द्वारे कौतुक केले.

भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं ट्विट मध्ये म्हटलेय की, या दुःखावर मात करण्यासाठी मोहम्मद सिराजला बळ मिळो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा… जबरदस्त व्यक्तिमत्व. कठीण प्रसंगातही देशहिताला प्राधान्य देणाऱ्या सिराजचे कौतुक वाटतेय.

सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचं ५३ व्या वर्षी हैदराबादमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झालं. शुक्रवारी सिडनीमध्ये मोहम्मद सिराज सराव करत होता. सराव करुन सिराज परतल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य कोच रवी शास्त्री यांनी वडिलांच्या निधनाबाबद सूचित केलं.

वडिलांनी रिक्षा चालवून सिराजचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले. मागील रणजी हंगामात हैदराबादकडून ४१ बळी घेतल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. २०१६-१७ च्या रणजी हंगामात हैदराबादकडून खेळत असताना सिराजने ४१ बळी घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर सिराजला आयपीएलमध्ये RCB च्या संघाकडून संधी मिळाली. तेराव्या हंगामात सिराजने RCB कडून खेळताना आश्वासक मारा केला होता. सिराजची चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.