भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा BCCI च्या अध्यक्षपदाचा मार्ग सोमवारी मोकळा झाला. अंतिम मुदत संपेपर्यंत अध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज आल्यामुळे गांगुलीला कोणीही प्रतिस्पर्धी नाही. त्यामुळेच त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र येत्या काही दिवसांत गांगुली भाजपावासी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. इतकेच नव्हे तर ममता दीदींच्या विरोधात भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून गांगुलीकडे पाहिले जात असल्याचीही चर्चा आहे.

सोमवारी दुपारी सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला. अनुराग ठाकूर गटाने सौरव गांगुलीला अध्यक्षपदासाठी आपला पाठींबा दर्शवला आहे. ज्यावरुन आगामी काळात सौरव गांगुली भाजपाकडून राजकारणाच्या मैदानात उतरणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली होती. त्यातच सौरव गांगुली BCCI च्या अध्यक्षपदावर लोढा समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कुलिंग-ऑफ काळासाठी म्हणजेच १० महिन्यांसाठी राहू शकतो. त्यामुळे १० महिन्यांनंतर जेव्हा गांगुली पश्चिम बंगालमध्ये परतेल, तेव्हा तो क्रिकेटपटू ते क्रिकेट प्रशासक असा प्रवास करून येईल की बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून नवी इनिंग खेळेल? अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

दरम्यान या संदर्भात अमित शाह यांनीही सूचक विधान केले आहे. “बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार? हे माझ्या हातात नाही. यासाठी बीसीसीआयची वेगळी निवडणूक प्रक्रिया आहे. अनेक खेळाडूंशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे सौरव गांगुली मला कधीही भेटू शकतो. पण माझी राजकीय बाबतीतील कोणतीही चर्चा सौरव गांगुलीसोबत झालेली नाही. सौरवबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. कोणत्याही प्रमुख चेहऱ्याशिवाय आम्ही बंगालमध्ये १८ जागा जिंकलो आहोत. याचा अर्थ आम्हाला बंगालमध्ये चेहऱ्याची गरज नाही, असा होत नाही. मात्र भविष्यकाळात सौरव गांगुलीने जर भाजपात येण्याचा निर्णय घेतला, तर त्याचं स्वागतच असेल.” असे उत्तर अमित शाह यांनी एका मुलाखतीत दिले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रशासक म्हणून गांगुलीनं चांगली कामगिरी केली तर त्याच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींना टक्कर देण्यासाठी भाजपा त्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करू शकते अशा चर्चांना उधाण आलं आहे.