महत्त्वाच्या क्षणी नांगी टाकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी ‘चोकर्स’ हा शिक्का योग्य असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. जेम्स ट्रेडवेलच्या फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला १७५ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडने हे आव्हान सात विकेट व ७५ चेंडू राखून पार करत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व ट्रेडवेल यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुंग लावल्यानंतर त्यांची ८ बाद ८० अशी स्थिती झाली होती. पण डेव्हिड मिलर (५६) आणि रॉरी क्लीनवेल्ट (४३) यांनी सुरेख फटकेबाजी करत आफ्रिकेला पावणेदोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. हे आव्हान पेलताना इंग्लंडने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले तरी जोनाथन ट्रॉट आणि जो रूट यांनी शांत आणि संयमी फलंदाजी करत १०५ धावांची भागीदारी रचली. ट्रॉटने नाबाद ८२ धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. २००४नंतर इंग्लंडने दुसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता २३ जूनला बर्मिगहॅम येथे रंगणाऱ्या अंतिम फेरीत इंग्लंडला भारत-श्रीलंका यांच्यातील विजेत्याशी झुंजावे लागेल.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ३८.४ षटकांत सर्व बाद १७५ (डेव्हिड मिलर नाबाद ५६, रॉरी क्लीनवेल्ट ४३, रॉबिन पीटरसन ३०; जेम्स ट्रेडवेल ३/१९, स्टुअर्ट ब्रॉड ३/५०) विरुद्ध इंग्लंड : ३७.३ षटकांत ३ बाद १७९ (जोनाथन ट्रॉट नाबाद ८२, जो रूट ४८; जेपी. डय़ुमिनी १/२७).
सामनावीर : जेम्स ट्रेडवेल.

जोस बटलरचा झेलांचा विक्रम
लंडन : इंग्लंडचा युवा यष्टिरक्षक जोस बटलरने सामन्यात सहा झेल मिळवण्याचा विक्रम नावावर केला. सहा किंवा त्यापेक्षा अधिक झेल टिपणारा बटलर हा जगातील सातवा तर इंग्लंडचा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी अशी कामगिरी अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मार्क बाऊचर, महेंद्रसिंग धोनी, रिडले जेकब्स, मॅट प्रॉयर आणि अ‍ॅलेक स्टुअर्ट यांनी केली होती.