रॉबिन उथप्पाचे दमदार शतक आणि लक्ष्मी रतन शुक्लाची भेदक गोलंदाजी हे अनुक्रमे दक्षिण आणि पूर्व विभागामधील दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचे वैशिष्टय़ ठरले. पूर्व विभागाने नाणेफेक जिंकत दक्षिण विभागाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारण केले. दक्षिण विभागाने चांगली सुरुवात केली होती, पण २ बाद २११वरून त्यांची ९ बाद २३६ अशी अवस्था झाली. उथप्पाने दमदार खेळ करत १४ चौकार आणि २ षट्कारांच्या जोरावर १२० धावांची अप्रतिम खेळी साकारली; तर दक्षिण विभागाच्या शुक्लाने ३० धावांमध्ये चार बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग (पहिला डाव) : ८६.५ षटकांत ९ बाद २३६ (रॉबिन उथप्पा १२०, करुण नायर ३२; लक्ष्मी रतन शुक्ला ४/३०, अशोक दिंडा २/५१) वि. पूर्व विभाग.
ओझा, सक्सेना यांची दमदार शतके
मोहाली : जलाज सक्सेना आणि नमन ओझा यांच्या शतकाच्या जोरावर मध्य विभागाने उत्तर विभागाविरुद्धच्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३४४ अशी मजल मारली आहे. मध्य विभागाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी त्यांना चांगली सुरुवात करता आली नव्हती. मध्य विभागाने ९७ धावांमध्ये दोन फलंदाज गमावले होते. पण त्यानंतर सक्सेना आणि ओझा यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी रचत संघाला स्थिरस्थावर केले. सक्सेनाने १७ चौकारांच्या जोरावर ११० धावांची खेळी साकारली, तर ओझाने १४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद १२२ धावा फटकावल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक
मध्य विभाग (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद ३४४ (नमन ओझा खेळत आहे १२२, जलाज सक्सेना ११०; रिषी धवन २/९३) वि. उत्तर विभाग.