दयानंद लिपारे

पोरसवदा वयात गावगाडय़ातील कुस्ती.. किशोर वयात थोराड मुलांना अस्मान दाखवण्याची हिंमत.. तारुण्यात हिंदकेसरीसारखा सर्वोच्च किताब.. प्रौढत्वाकडे झुकल्यावर विदेशातील मल्लांवर विजय.. वयस्क झाल्यावर नवी पिढी घडतानाच यशस्वी संघटक.. असा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘कुस्तीमधील किमयागार’ श्रीपती खंचनाळे यांच्या यशाचा आलेख उंचावत राहिला. सीमा भागातील शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या श्रीपतींनी चापल्यपूर्ण कुस्ती कौशल्याच्या आधारे जगभर नाव कमावताना कोल्हापूरची कुस्तीची परंपरा अथकपणे पुढे सुरू ठेवली.

कोल्हापूरपासून ४५ किलोमीटर अंतरावरील कर्नाटकातील एकसंबा गावातील मोठी शेतीवाडी असलेले शंकर  खंचनाळे यांनी आपल्या मुलाने श्रीपतीने कुस्तीत नाव कमवावे, यासाठी प्रयत्न केले. बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागल्याने वडिलांनी श्रीपतीला कोल्हापुरात हसनबापू तांबोळी, विष्णू नागराळे, मल्लाप्पा तडाखे यांच्या स्वाधीन केले. त्यांनी श्रीपतीची अशी काही तयारी करून घेतली की, त्याच्यापुढे समवयीन टिकणे कठीण झाले. तेव्हा कर्नाटकातील गाजलेल्या रंगा पाटीलवर सहज विजय मिळवल्यावर किशोरवयीन श्रीपतीची चर्चा सुरू झाली. मग तारुण्यात श्रीपतीने मागे वळून पाहिलेच नाही. देशात समकालीन एकेका मल्लांना धूळ चालण्याचा जणू विडाच उचलला.

जमीर मोहम्मद, शामराव मुळीक, खडक सिंग, बंडा सिंग, मेहर उद्दीन, छोटा भगवती, मोती पंजाबी, जीरा पंजाबी, गणपत आंधळकर, चांद पंजाबी अशा सरस मल्लांना त्याने धूळ चारली. झटपट कुस्ती हे श्रीपतीचे वैशिष्टय़. सुखदेव सन्या (सात सेकंद), इस्लाम (चार मिनिटे), टायगर (तीन मिनिटे), वचनसिंग (चार मिनिटे), चांद पंजाबी (दोन मिनिटे), बंत्ता सिंग (दहा मिनिटे) अशी झटपट विजयश्री मिळवण्याच्या शैलीने कुस्तीशौकिनांनी श्रीपतींना खांद्यावर घेतले.

खासबाग मैदानात सादिक पंजाबी या सर्वश्रेष्ठ मल्लाशी साडेतीन तासांच्या कुस्तीत बरोबरी राखली. बडय़ा मल्लांना चीत केल्यामुळे आव्हान देणारा जणू कोणी उरलाच नसल्याने १९५९ साली ‘महाराष्ट्र केसरी’ व ‘हिंदकेसरी’साठी निवड झाली. ‘रुस्तुम ए हिंद’ बनता सिंग याच्याशी दोन हात करीत श्रीपतींनी यश मिळवले आणि देशातील ‘हिंदकेसरी’ची पहिलवहिली प्रतिष्ठित गदा मिळवत कोल्हापुरच्या कुस्तीची मान उंचावली. त्यांचा सन्मान करण्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. पाठोपाठ ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा त्यांनी सहजगत्या मिळवली.

आता देशात कोणी आव्हान देणारे उरले नव्हते. विदेशात जाऊन तेथील मल्लांना नामोहरम करण्याच्या ईष्र्येने खंचनाळे यांनी सराव के ला. पण इच्छा आणि तंत्र यात तफावत निर्माण झाली. १९६३ साली रशिया गाठली. मातीवरचा हा पैलवान गडी गादीवरच्या कुस्तीवर टिकाव धरू शकला नाही.  नवे जग, नवे तंत्र पाहून ते अवगत करण्यासाठी त्यांनी दिल्लीत गादीवरील कुस्तीचा सराव केला आणि त्यात पारंगत झाले. मग त्यांची नजर विदेशाकडे गेली. पारपत्र नसतानाही पाकिस्तानात जाऊन तेथील मल्लांना हरवण्यात खंचनाळे यशस्वी झाले. पुढे इराक, इराण या मुस्लीमबहुल देशांमध्ये यशाचा आलेख उंचावत ठेवला. इतकेच काय जर्मनी, फ्रान्स या युरोप खंडातील गोऱ्या मल्लांना चित्तपट केले.

मग कोल्हापुरात आल्यानंतर खंचनाळे यांनी कुस्तीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शाहूपूरी तालमीत तरुण पिढी घडवण्याचे व्रत स्वीकारले, तेव्हा १०० पैलवान सराव करत होते. पुढे ही संख्या ३००वर गेली. प्रत्येक पैलवानाच्या आहारविहार सवयी यासह प्रगतीवर बारीक लक्ष असे. त्यामुळे यशस्वी मल्लांची मांदियाळीच कोल्हापुरात तयार झाली. यापैकी एक जण ‘हिंदकेसरी’ तर पाच जण ‘महाराष्ट्र केसरी’ झाले. कुस्ती प्रशिक्षक, पंच कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी या जबाबदाऱ्याही यशस्वीपणे पेलत्या. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते कुस्तीशी निगडित राहिले, बलदंड हे मल्ल आयुष्याच्या संध्याकाळी आजाराशी लढताना मात्र हतबल झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेताना सारा पैसा हातोहात खर्ची पडला. शासकीय अनुदान आणि आश्वासने तोकडी पडली. पुन्हा एकदा आजाराने गाठले. शासनाने पाच लाखांची मदत केल्याने काहीसा दिलासा मिळाला. गोकुळ दूध संघसारख्या संस्थेने व्हीलचेअर दिल्याने थोडेफार चालता-फिरता येऊ लागले होते. पण आरोग्याची अखेरची लढाई त्यांना जिंकता आली नाही. एके काळी दोन किलो मटण, एक किलो सूप असा आहार पचवणारे आजाराशी लढताना मात्र हतबल झाले. यातच त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली. राजर्षी शाहू महाराजांच्या लाल मातीच्या कुस्तीला गौरव मिळवून देण्यात मात्र ते कायमच निर्विवाद यशस्वी ठरले.