सतत पडणारा पाऊस आणि त्यानंतर मैदानावरील अंधुक प्रकाशामुळे, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. दिवसभरात केवळ ११.५ षटकांचा खेळ झाला. या खेळात भारताने १७ धावांच्या मोबदल्यात आपले ३ गडी गमावले आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेने खेळपट्टीचा फायदा उचलत भारताच्या आघाडीच्या फळीला दणके दिले. सामन्यातल्या पहिल्याच चेंडुवर सुरंगा लकमलने लोकेश राहुलला माघारी धाडलं. यानंतर भारतीय फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र सततचा पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात सतत व्यत्यय येत गेला.

अखेर पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून पहिल्या दिवसात सुरंगा लकमलने ३ विकेट घेतल्या. ११.५ षटकांपैकी ६ षटके सुरंगा लकमलने टाकली. यातली सर्व षटक निर्धाव टाकण्यात लकमल यशस्वी झाला. स्थानिक वेधशाळेने शनिवारपर्यंत कोलकात्यात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारताची मदार ही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर असणार आहे.

  • पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, भारताचे ३ गडी माघारी
  • अंधुक प्रकाशामुळे खेळात पुन्हा व्यत्यय, पंचांनी खेळ थांबवला
  • खेळपट्टीचा फायदा उठवत लंकन गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वरचढ
  • सुरंगा लकमलचा भारताला पुन्हा दणका, कर्णधार कोहलीला शून्यावर धाडलं माघारी
  • चहापानानंतर पुन्हा खेळ सुरु
  • दोन्ही संघातील खेळाडूंशी चर्चा करुन पंचांनी सामना थांबवला
  • अंधुक प्रकाश आणि पावसाचा सामन्यात व्यत्यय
  • मात्र धवनचा त्रिफळा उडवत लकमलचा भारताला दुसरा दणका, भारताचे सलामीवीर माघारी
  • पुजारा-धवन जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • पहिल्याच चेंडूवर भारताला पहिला धक्का, सलामीवीर लोकेश राहुल माघारी
  • पाऊस थांबल्याने अवघ्या काही मिनीटात खेळाला सुरुवात
  • पंचांनी खेळ पुन्हा थांबवला, सामना सुरु होण्यास उशीर होणार
  • सामन्यात पहिला चेंडू टाकण्याआधीच पावसाची पुन्हा हजेरी
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
  • मैदानातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे सामना सुरु करण्यात यश
  • पहिल्या कसोटीत पावसाचा व्यत्यय, पहिलं सत्र वाया