सी. के. नायडू स्पर्धेत शिव सिंग या उत्तर प्रदेशच्या गोलंदाजाने ३६० अंशात फिरून गोलंदाजी केल्यामुळे त्याच्या ‘त्या’ चेंडूवर पंचांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गोलंदाजीची कोणती शैली योग्य आणि कोणती शैली अचूक या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटल. हे प्रकरण ताजे असतानाच श्रीलंकेचा फिरकीपटू अकीला धनंजय याच्या गोलंदाजीच्या शैलीवरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिली कसोटी गॉलच्या मैदानावर झाली. या सामन्यात श्रीलंकेचा फिरकीपटू अकीला धनंजय याची गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह असल्याचे संघात याबाबत ICCकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे धनंजयला पुढील १४ दिवसांच्या कालावधीत आपल्या गोलंदाजीच्या शैलीची चाचणी देणे क्रमप्राप्त आहे. पण या १४ दिवसांच्या कालावधीत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकतो, असे ICCने सांगितले आहे. त्यामुळे १४ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत त्याची निवड झाली, तर तो गोलंदाजी करू शकणार आहे. पहिल्या सामन्यात त्याला केवळ दोन गडी बाद करता आले होते.

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर इंग्लंडने २११ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथ याची ही अंतिम कसोटी होती. या सामन्यात त्याने गॉलच्या मैदानावर आपले १०० बळी पूर्ण करण्याचा पराक्रम केला, मात्र हा सामना श्रीलंकेला जिंकता आला नाही.