03 March 2021

News Flash

वॉवरिन्का, निशिकोरी तिसऱ्या फेरीत

सानिया, बोपण्णा यांची विजयी सलामी, विल्यम्स भगिनींचा शानदार विजय

| May 26, 2016 03:14 am

स्टॅनिसलॉस वॉवरिन्का

सानिया, बोपण्णा यांची विजयी सलामी, विल्यम्स भगिनींचा शानदार विजय
विजेतेपदाचा दावेदार असलेला स्टॅनिसलॉस वॉवरिन्का व जपानचा कोई निशिकोरी यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. भारताच्या सानिया मिर्झाने मार्टिना हिंगिसच्या साथीत विजयी सलामी दिली, तर रोहन बोपण्णानेही पुरुष दुहेरीत विजयी प्रारंभ केला. सेरेना व व्हिनस या विल्यम्स भगिनींनी दुहेरीत शानदार सुरुवात केली. त्यांनी येलेना ऑस्टिपेन्को (लाटविया) व युलिया पुतीनत्सेवा (कझाकिस्तान) यांना ६-२, ६-२ असे निष्प्रभ केले. सानिया व हिंगिस यांनी दारिया कसातकिना व अ‍ॅलेक्झांड्रा पॅनोवा या रशियन खेळाडूंवर मात केली. चुरशीच्या लढतीत त्यांनी ७-६ (७-४), ६-२ असा विजय नोंदविला. अ‍ॅण्डी मरेचा संघर्ष दुसऱ्या फेरीतही कायम राहिला. फ्रान्सच्या मॅथीएस बोग्र्यूने ०-१ अशा पिछाडीनंतर २-१ अशी आघाडी घेत मरेला झुंजवले, परंतु अनुभवाच्या जोरावर मरेने ६-२, २-६, ४-६, ६-२, ६-३ असा विजय मिळवला.
वॉवरिन्काने जपानच्या तारो डॅनियलचे आव्हान ७-६ (९-७), ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. पहिल्या सेटमध्ये त्याला टायब्रेकपर्यंत झुंजावे लागले. हा सेट घेतल्यानंतर त्याने खेळावरील पकड मजबूत केली. त्याने दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविले. याच ब्रेकच्या आधारे त्याने हे दोन्ही सेट्स घेतले आणि सामना जिंकला. निशिकोरीने आंद्रे कुझ्नेत्सोवाला ६-३, ६-३, ६-३ असे सहज पराभूत केले. शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या लढतीत क्रोएशियाच्या इव्हो कालरेविकने ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसन याला हरवित तिसरी फेरी गाठली. हा सामना त्याने ६-७ (२-७), ६-३, ७-६ (७-३), ६-७ (४-७), १२-१० असा जिंकला. अमेरिकन खेळाडू जॉन इस्नेर याने इंग्लंडच्या काईल एडमुंड याचे आव्हान ६-४, ६-४, ६-४ असे संपुष्टात आणले. निक किर्गिओस याने इगोर सिझलिंग याच्यावर ६-३,६-२, ६-१ असा सफाईदार विजय मिळविला. दुहेरीत बोपण्णाने रुमानियाच्या फ्लोरिन मर्जिआच्या साथीत फ्रान्सच्या स्टीफनी रॉबर्ट व अ‍ॅलेक्झांड्री सिमोरेन्को यांच्यावर ६-२, ६-२ असा सफाईदार विजय नोंदविला.
महिलांमध्ये तेराव्या मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने इंग्लंडच्या हीदर व्ॉटसनवर ६-१, ६-३ असा सफाईदार विजय मिळविला. दहाव्या मानांकित पेत्रा क्विटोवाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिने तैवानच्या सुई वेई हेसिहेवर ६-४, ६-१ अशी मात केली. सहाव्या मानांकित सिमोना हॅलेपला कझाकिस्तानच्या झरिना दियास हिच्याविरुद्ध ७-६ (७-५), ६-२ असा विजय मिळविताना झगडावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 3:14 am

Web Title: stan wawrinka
Next Stories
1 माद्रिदच्या विजयासाठी रोनाल्डोची तंदुरुस्ती महत्त्वाची
2 उत्तेजक सेवन करत नसल्याचा अ‍ॅना चिचेरोव्हाचा दावा
3 एका गुणाच्या फरकाने हिनाची अंतिम फेरी हुकली
Just Now!
X