जागतिक क्रमवारीत तिसऱया मानांकीत स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिन्काने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. वॉवरिन्काने अग्रमानांकीत नोवाक जोकोविचचा ६-७(१), ६-४, ७-५, ६-३ अशा सेटमध्ये पराभव करून पहिल्यांदाच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.

सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिला सेट जोकोविचने ६-७(१) असा खिशात घातला होता. मग पुढील सेटमध्ये वॉवरिन्काने पुनरागमन केले. अफलातून बॅकहॅण्ड, ताकदवान फोरहॅण्ड आणि खोलवर सव्‍‌र्हिस करत वॉवरिन्काने सामन्यात जोकोविचला झुंझ दिली. चौथ्या सेटमध्ये वॉवरिन्काकडे ३-१ अशी आघाडी असताना जोकोविचने वैद्यकीय कारणासाठी ब्रेक घेतला होता. जोकोविचने आपल्या प्रशिक्षकांना बोलावून पायाच्या दुखापतीची चाचपणी केली. जोकोविचने घेतलेल्या सहा मिनिटांच्या ब्रेकबाबत वॉवरिन्काने पंचांकडे तक्रार नोंदवली. मग जोकोविचने दिलगिरी व्यक्त करत पुन्हा सामन्याला सुरूवात केली. जोकोविचने त्यानंतर तीन ब्रेक पॉईंटची कमाई देखील केली, मात्र वॉरिन्काने पुढील सेटमध्ये आघाडी कायम राखत सामना खिशात घातला. पुढील तीन सेटमध्ये वॉवरिन्काने ६-४, ७-५, ६-३ अशी दमदार कामगिरी केली. याआधी वॉवरिन्का आणि जोकोविच २४ वेळा आमने-सामने आले असून, वॉवरिन्काला केवळ ५ सामने जिंकता आले आहेत. वॉवरिन्का यंदा पहिल्यांदाच अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता, तर जोकोविचची अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची यंदाची सातवी वेळ होती. पण यावेळी वॉवरिन्काने मिळालेल्या संधीचे सोने करत अमेरिकन ओपनचा चषक उंचावला. वॉवरिन्काचे हे कारकीर्दीतील तिसरे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद ठरले.

वॉवरिन्काने जपानच्या केइ निशिकोरीवर ४-६, ७-६, ६-४, ६-२ अशी मात करून वॉवरिन्काने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे गतविजेत्या नोवाक जोकोविचने फ्रान्सच्या गेल माँफिल्सवर ६-३, ६-२, ३-६, ६-२ अशी मात करून अंतीम फेरी गाठली होती.  वॉवरिन्काने विजेतेपद पटकावल्यानंतर जोकोविचने वॉवरिन्काचे कौतुक केले.  वॉवरिन्का ‘बिग-मॅच प्लेअर’ असल्याचे जोकोविच म्हणाला. वॉवरिन्काने विजितेपद स्विकारल्यानंतर ९/११ हल्ल्यातील मृत्युमुखींची आठवण काढली. यासोबतच नोवाक जोकोविच एक उत्तम खेळाडूसह एक व्यक्ती म्हणूनही खूप चांगला असल्याचेही वॉवरिन्का म्हणाला.