करोनामुळे जवळपास तीन महिने फुटबॉलपासून दूर राहणाऱ्या वुहान शहरातील खेळाडूंसह असंख्य नागरिकांनी सोमवारपासून मैदानांवर फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला.

एप्रिल महिन्यात वुहानमध्ये काटेकोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परंतु आता शहरातील करोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्याने तेथील मैदाने खुली करण्यात आली असून खेळाडूंबरोबरच फुटबॉलचे चाहतेही मैदानावर उतरले असल्याचे दृश्य सगळीकडे सोमवारी रात्री पाहायला मिळाले. यामध्ये चायनीज सुपर लीगमधील वुहान झॉल आणि तिसऱ्या विभागातील वुहान स्टार्स या संघांतील खेळाडूंचाही समावेश होता.

काही नागरिकांनी सुरक्षित अंतराचे भान न राखता मनसोक्तपणे सराव केला, परंतु खेळाडूंनी मात्र चेहऱ्यावर मुखपट्टी लावून सराव करण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, चायनीज सुपर लीग २२ फेब्रुवारीपासून स्थगित करण्यात आली असून जून महिन्यात ही लीग पुन्हा सुरू होऊ शकते.