वरळी स्पोर्ट्स क्लबद्वारे आयोजित आमदार चषक राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया, देना बँक संघांनी उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. एअर इंडियाने गुरुकुल चिपळण संघावर ३४-२९ असा विजय मिळवला. अजय कुमार आणि राहुल चौधरी या खेळाडूंनी शानदार खेळ करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. मध्यंतराला गुरुकुलचा संघ १५-१४ अशा स्थितीत होता. विश्रांतीनंतर गुरुकुलने लोण चढवून २५-२२ अशी आघाडी घेतली. २६-२६ अशी बरोबरी असताना अनुभवी अजय आणि राहुल यांनी आपला खेळ उंचावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या लढतीत देना बँकेने महिंद्रा अँण्ड महिंद्रा संघावर ३२-२८ अशी मात केली. देना बँकेतर्फे सुयोगने शानदार खेळ केला. नितीन मोरेच्या चढाया आणि संकेत सावंतच्या पकडी पूरक ठरल्या. मध्य रेल्वेने रायगड पोलीस संघाला २६-२२ असे नमवले. आर्टिलरी सेंटर नाशिकने मुंबई पोलीस संघाचा ४२-३० असा पराभव केला. आर्टिलरीकडून कर्मवीर, सदानंद, जयदीप आणि विजय पाल यांनी सुरेख खेळ केला.