आमदार चषक व्यावसायिक गट राज्यस्तरीय स्पध्रेत देना बँक आणि महाराष्ट्र पोलीस संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत मध्य रेल्वे विरुद्ध आयकर, आर्मी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस, बीईजी विरुद्ध एअर इंडिया आणि देना बँक विरुद्ध भारत पेट्रोलियम अशा लढती होतील.

नितीन देशमुखच्या चिवट खेळीने देना बँकेला बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला. देना बँकेने त्याच्या दमदार खेळाच्या जोरावर महिंद्रा आणि महिंद्राविरुद्धची हातातून निसटलेली लढत ३४-३४ अशी बरोबरीत सोडवली. देना बँक आणि महिंद्राला एकही विजय मिळवता आला नसला तरी सरस गुणांच्या आधारे देना बँकेने गटात दुसरे स्थान मिळवत बाद फेरी गाठली. सामन्याच्या प्रारंभीच ओमकार जाधव, स्वप्निल शिंदे आणि अजिंक्य पवार यांनी महिंद्रा संघाला १०-५ अशी आघाडी मिळवून दिली; पण नितीनने खोलवर चढाया करून पिछाडी भरून काढण्याबरोबरच महिंद्रावर लोण चढवला आणि मध्यंतराला सामन्यात १७-१४ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर ओमकारने वेगवान चढाया करताना देना बँकेवर लोण चढवला. पुढच्या तीन मिनिटांच्या खेळात आणखी एक लोण चढवत महिंद्राची आघाडी ३०-१९ अशी वाढली; पण नितीनने सलगच्या चढाईत दोनदा दोन-दोन गुण टिपत महिंद्रावर लोण चढवून देना बँकेची पिछाडी २९-३३ अशी भरून काढली. शेवटच्या काही सेकंदांत पुन्हा नितीनने चतुर खेळ करत सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला.

एअर इंडियाच्या विकास काळेच्या सुसाट चढायांमुळे नाशिक आर्मीला ५२-३५ असा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्र पोलिसांनीही सलग दुसरा विजय नोंदविताना बीईजीचा ३७-३१ असा पराभव केला. पोलिसांकडून महेश मकदूमने भन्नाट खेळ केला. या विजयात त्याला बाजीराव होडगे, महेंद्र राजपूत यांची साथ लाभली.